पोलिस दलाकडून सामान्य ज्ञान स्पर्धेसह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

शिस्तबद्ध बाईक रॅलीने वेधले गडचिरोलीकरांचे लक्ष

सामान्य ज्ञान स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना चाॅकलेट वाटताना पोलीस अधीक्षक नीलोत्पल

गडचिरोली : आदिवासी दिनाचे औचित्य साधून बुधवारी पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्रोजेक्ट प्रयासअंतर्गत 101 आश्रमशाळेत चौथी वीर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. 400 पोलिस अधिकारी व अंमलदारांचा सहभाग असलेली बाईक रॅली विशेष आकर्षण ठरली. तसेच महिला सक्षमीकरणाकरिता भाजीपाला लागवड प्रशिक्षण, वृक्षारोपण, स्टुडंट्स पोलीस कॅडेटची शौर्य स्थळाला भेट आदी कार्यक्रम जिल्हा मुख्यालयी झाले.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केल्यानंतर पोलीस कवायत मैदान ते इंदिरा गांधी चौकापर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 400 पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला. बाईक रॅलीचा समारोप शहीद पांडू आलाम सभागृहात पार पडला. यावेळी वीर बाबुराव शेडमाके आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पोलीस अधीक्षकांनी मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.

‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमाअंतर्गत पोलीस अधिकारी/अंमलदार यांना पंचप्रण शपथ देण्यात आली. प्रोजेक्ट प्रयासअंतर्गत सामान्य ज्ञान परीक्षेचा शुभारंभ शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा नवेगाव येथे पार पडला. यामध्ये जिल्ह्रातील 101 आश्रमशाळांमध्ये प्रोजेक्ट प्रयासचा चवथा टप्पा सुरु करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

स्टुडंन्ट पोलीस कॅडेटच्या 50 विद्यार्थ्यांनी पोलीस मुख्यालय येथील शौर्य स्थळास भेट दिली. त्यांना शौर्य स्थळाबद्दल माहिती सांगण्यात आली. प्रत्यक्ष हेलिकॉप्टरची पाहणी करुन त्याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

पोलीस मुख्यालय येथील एकलव्य हॉलमध्ये कृषी समृध्दी योजनेअंतर्गत दुर्गम भागातील महिला बचत गट सक्षमीकरणाकरीता “भाजीपाला लागवड प्रशिक्षण” आयोजीत करण्यात आले होते. यामध्ये 26 महिला बचत गटाच्या 260 महिला सदस्यांनी सहभाग नोंदविला. बचत गटातील महिला शेतक­यांना स्प्रे पंप, कृषी खत, सीताफळाची रोपे वाटप करण्यात आली. याच कार्यक्रमात श्वेता कोवे, रा.कढोली हिची 10 मिटर पिस्टल पॅरा टुर्नामेंटकरीता निवड झाल्याने व सौरभ सुखदेव जिलेपल्लीवार याची एनपीसीआयएल, कैगा-कर्नाटक येथे वैज्ञानिक म्हणून निवड झाल्याने त्याच्या आई-वडीलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी विभागाचे व कृषी विज्ञान केंद्राचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय स्तरावर व पोस्टे, उपपोस्टे व पोमके स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.