आदिवासी दिनानिमित्त गडचिरोलीत अवतरला पिवळा जनसागर, सर्वत्र जल्लोष

कुठे रॅली, तर कुठे ग्रामसभांकडून विचारमंथन

गडचिरोली : आदिवासीबहुल जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ९ आॅगस्ट हा आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. सरकारी सुटी देण्यात आल्याने आदिवासी एम्प्लॅाईज फेडरेशनच्या वतीने शहराच्या मुख्य मार्गाने रॅलीचे आयोजन केले होते. यात मोठ्या संख्येने युवक-युवतींसह महिला-पुरूष कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले होते.

पिवळे वस्र धारण करून पारंपरिक आदिवासी गीतांवर सर्वांचे पाय थिरकत होते. अनेक तालुकास्थळीही याच पद्धतीने रॅली काढण्यात आल्या. दुसरीकडे ग्रामसभांच्या वतीने गडचिरोलीत जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यात आदिवासी समाजाने कोणत्याही राजकीय पक्षांच्या दावणीला स्वतःला बांधून न घेता आपल्या अधिकारांचे रक्षण आपणच करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.