तुम्ही व्हॅालिबॅालचे खेळाडू आहात? मग मिळवा दरमहा 3 हजार

उदयोन्मुख खेळाडूंना घेणार दत्तक

गडचिरोली : व्हॅालिबॅालचे राष्ट्रीय प्रशिक्षक अजित पाटील (कोल्हापूर) यांच्या दिशा अकॅडमी, बाचणी (जि.कोल्हापूर) आणि भारतीय व्हॉलिबॉल प्रेमी संघटना यांच्या वतीने महाराष्ट्रातील उदयोन्मुख व्हॅालिबॅाल खेळाडूंसाठी दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे. त्यात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट 10 खेळाडू निवडून त्यांना दरमहा 3 हजार रुपये (3000 रुपये) स्कॉलरशिप दिली जाणार आहे.

खेळाडूंची निवड शारीरिक क्षमता चाचणी घेऊन केली जाणार आहे. 12 ते 14 वर्ष वयोगटातील खेळाडूंची यात निवड केली जाणार आहे. संबंधित खेळाडू 31 डिसेंबर 2023 रोजी 14 वर्षापेक्षा कमी आणि 12 वर्षापेक्षा जास्त असावा. निवडलेल्या खेळाडूंच्या पालकांचे संमतीपत्र गरजेचे आहे. निवड झालेल्या खेळाडूंना व्हॉलिबॉल खेळाबरोबरच शालेय शिक्षण दिले जाणार आहे.

हे खेळाडू दिशा अकॅडमी येथे निवासी संकुलात प्रवेशित केले जातील. त्यांना शास्त्रशुद्ध क्रीडा मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण आणि सकस आहार दिला जाणार आहे. राज्य संघटना आणि शासकिय क्रीडा स्पर्धेतही त्यांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंना भारतीय सैन्य दल, पोलिस दल, रेल्वे, इन्कम टॅक्स, एक्साईज, एल.आय.सी इत्यादी ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 8411944241 वर संपर्क करावा, असे आवाहन दिशा अकादमीचे संचालक अजित पाटील यांनी केले आहे.