Home दैनंदिन बातम्या प्रसुतीपूर्वी पोटातच बाळ दगावले, उपचारादरम्यान मातेने सोडला जीव

प्रसुतीपूर्वी पोटातच बाळ दगावले, उपचारादरम्यान मातेने सोडला जीव

चामोर्शी रुग्णालयाच्या सेवेवर प्रश्नचिन्ह

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील एका गरोदर महिलेला चामोर्शीच्या ग्रामीण रुग्णालयातून गंभीर अवस्थेत गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात प्रसुतीसाठी आणत असताना बाळाने प्रसुतीआधीच जीव गमावला, तर प्रसुतीनंतर मातेनेही उपचाराला प्रतिसाद न देता प्राण सोडले. ही दुर्दैवी घटना रविवारी घडली. जिजा हंसराज सातर (21 वर्ष), रा.जामगिरी, ता.चामोर्शी असे मृत महिलेचे नाव आहे.

जिजा सातर यांना काल पहाटे 5 वाजता पोटात दुखू लागल्याने आणि गरोदरपणाचा कालावधी पूर्ण झाल्याने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. सकाळी 9 पासून तिला प्रसुतीकळा सुरू झाल्या. काही वेळात प्रसुती होईल असे तिथल्या नर्सनी सांगितले. पण तोपर्यंत डॅाक्टर आलेले नव्हते. शेवटी त्रास वाढत असताना प्रसुती होत नसल्याने नर्सने तपासले आणि तुम्हाला गडचिरोलीला रेफर करावे लागेल असे सांगितले. त्यानंतर डॅाक्टरला रेफर लेटरवर सही करायला या, असा निरोप नर्सने दिला आणि नंतर डॅाक्टर आले, असे हंसराज सातर यांनी सांगितले. वास्तविक गडचिरोलीला नेण्यास उशिर होईल, त्यामुळे इथेच सिझर करा, अशी विनंती सातर यांनी केली. पण कोणीही त्यांचे ऐकले नाही आणि 10.30 च्या सुमारास गडचिरोलीला रवाना करण्यात आले.

गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात पोहोचल्यानंतर बाळाचे ठोके बंद झालेले असल्याचे सांगण्यात आले. लगेच जिजा यांना प्रसुतीकक्षात घेण्यात आले. पण प्रसुतीनंतर संध्याकाळी 5 च्या सुमारास जिजा यांनीही प्राण सोडल्याचा निरोप कुटुंबियांना देण्यात आला. सदर महिलेला जास्त रक्तस्राव झाल्यामुळे तिची प्रकृती गंभीर झाली. डॅाक्टरांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न केले, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.वर्षा लहाडे यांनी सांगितले.

डॅाक्टरची खासगी दुकानदारी

प्राप्त माहितीनुसार, हंसराम चातर यांनी पत्नी जिजा गरोदर झाल्यानंतर तिसऱ्या महिन्यात पहिल्यांदा चामोर्शीच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते. त्यावेळी रक्त, लघवी वगैरे सर्व चाचण्या तिथे झाल्या, पण सोनोग्राफीसाठी त्यांना डॅाक्टर देवरे यांच्या खासगी क्लिनिकमध्ये जावे लागले. चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात डॅाक्टर देवरे हे केवळ शुक्रवारीच सोनोग्राफीची सेवा देतात. इतर दिवशी त्यांच्या खासगी क्लिनिकमध्येच जावे लागते असे सांगण्यात आले. मात्र शुक्रवारी ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफीसाठी गेलो तरीही टाळाटाळ करून खासगी क्लिनिकमध्ये सोनोग्राफी करण्यासाठी प्रवृत्त केले जाते, अशी व्यथा संबंधितांनी व्यक्त केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.