गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि आत्मिक विकासासाठी खेळ अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. खेळातून कुशलता, डावपेच, अचूकता, शोधवृत्ती, आरोग्य सदृढता आदी मूल्यांची जपणूक होते. खेळाडू घडविण्याचे मुख्य स्त्रोत प्रशिक्षण शिबिर आहे. अशा क्रीडा प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांवर शारीरिक व मानसिक संस्कार केले जातात. खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा प्रशिक्षण शिबिरे महत्वपूर्ण ठरतात, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी केले.
आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवनच्या वतीने आयोजित योग व क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महारोगी सेवा समितीचे संचालक डॉ.विकास आमटे, उपविभागीय पोलिस अधिकारी नवमी साटम, आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मृणाल काळे, उपप्राचार्य डॉ.राधा सवाने, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
कुलगुरू डॉ.बोकारे म्हणाले, समाजाला सकारात्मक दिशेने नेण्याचा “आनंदवन”चा संकल्प असून भावी पिढी घडविण्याचे कार्य आनंदवन करीत आहे. आज लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांचा कल मोबाईल वापराकडे अधिक दिसून येतो, हे टाळायला हवे. मुलांवर कोणते संस्कार करावेत हे पालकांना ठरवायचे असते. पालकांनी या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्यामुळे 736 विद्यार्थी या क्रीडा प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊ शकले. समाजाला सकारात्मक दिशेने नेण्याचा आनंदनिकेतन महाविद्यालय व आनंदवनचा 75 वर्षापूर्वीचा संकल्प होता, तो या शिबिराच्या माध्यमातून अभिव्यक्त होताना दिसत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.
श्रद्धेय बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आनंदवन उभे केले. आनंदवनात बाबा आमटे यांची तिसरी ते चौथी पिढी कार्यरत असल्याचे डॉ.विकास आमटे यांनी सांगितले. आनंदवनातील कुष्ठरुग्ण व अंधांसाठी थेरेपेटीक स्विमिंग पूल, व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण आणि व्यसनमुक्तीकडे वाटचाल आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही डॉ.आमटे यांनी यावेळी सांगितले.
उपविभागीय पोलिस अधिकारी नवमी साटम म्हणाल्या, जीवनात लागणारे कौशल्य व मूल्य खेळातूनच मिळतात. जीवनातील इतर क्षेत्रांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यास मदत मिळते. त्यासोबतच विद्यार्थ्यांना अनुशासन हे मैदानातूनच मिळत असते. खेळातून ध्येय निश्चित करणे व ते साध्य करणे विद्यार्थी शिकू शकतात. त्यामुळे भविष्यात शैक्षणिक आणि करिअरच्या उद्दिष्टांसाठी ही कौशल्ये अमूल्य असल्याचेही त्या म्हणाल्या.
विद्यार्थ्यांना पारंपरिक खेळ व क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण
20 दिवसीय शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना 28 विविध क्रीडा प्रकारचे प्रशिक्षण नियमित दिल्या गेले. यामध्ये योगासन, कराटे, क्रिकेट, फुटबॉल, एरोबिक्स, मल्लखांब, नेटबाॅल, खो-खो, बॅडमिंटन आदींचे प्रशिक्षण देण्यात आले.
विविध खेळ प्रकार आणि कवायतींचे सादरीकरण
सदर शिबिरामध्ये योग कवायत, लाठी कवायत, दंडबैठका, घुंगरू काठी, रोप मल्लखांब, लेझिम, कराटे, सूर्यनमस्कार आदी खेळ प्रकार, कवायत व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांकडून करण्यात आले.
उत्कृष्ट प्रशिक्षक व शिबिरार्थींचा सत्कार
यावेळी विवेक दुबे, अक्षिता तिखट, दीपक शिव, कुणाल दातारकर, मयुरी गाडगे, नरेंद्र कन्नाके, उषा उरकुडे, प्रियंका कडस्कर, चेतन चिंचोळकर, पंकज शेंडे, श्रीकांत लोहकरे, अक्षिता तिखट, सायली उपरे आदी प्रशिक्षकांचा, तसेच आर्यन काळे, आयुष महल्ले, कस्तुर राऊत, विधी भोगेकर, शुभ्रा ठाकरे आदी शिबिरार्थींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.