देसाईगंज : धानाला 25 हजार रुपये बोनस देण्यासोबत संपूर्ण कर्जमुक्त करून त्यांचा सातबारा कोरा करणार, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी देसाईगंज येथे आयोजित जाहीर सभेत दिले. महायुतीचे उमेदवार आ.कृष्णा गजबे हे विधानसभेतील सर्वात सज्जन आमदार आहेत. दोन टर्म आमदार राहिल्यानंतरही त्यांच्या डोक्यात आमदारकी घुसलेली नाही. अशा सर्वसामान्यांशी नाळ जुळलेल्या आमदाराला पुन्हा निवडून देऊन विधानसभेत पाठवा, असे आवाहन ना.फडणवीस यांनी यावेळी केले.
कुरखेडा मार्गावरील मैदानात आयोजित या जाहीर सभेला नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. त्यामुळे अनेक नागरिक सभामंडपाच्या बाहेर उन्हातही बसून होते. ही गर्दी आ.गजबे यांच्या विजयाची ग्वाही देत असल्याच्या प्रतिक्रिया सभास्थळी उमटत होत्या.
यावेळी मंचावर सहकार विकास महामंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, विधानसभा निरीक्षक श्रीनिवास, गडचिरोली जिल्हा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, महायुतीचे उमेदवार कृष्णा गजबे, विधानसभा समन्वयक किशन नागदेवे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, जिल्हा उपाध्यक्ष राजू जेठानी, शिवसेनेचे नेते नारायण धकाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युनुस शेख, संजय साळवे, किशोर तलमले, पीरिपा कवाडे गटाचे मुकेश खोब्रागडे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू हुसैनी, भाजप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष शालू दंडवते, जिल्हा उपाध्यक्ष आशा नाकाडे, भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील पारधी, कुरखेडा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, आरमोरी तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, शहराध्यक्ष सचिन खरकाटे, न.प.चे आरोग्य सभापती भारत बावनथळे आदी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये देणार, शेतीच्या सिंचनासाठी सती नदी व गाढवी नदीवर बंधारे बांधणार, वडसाला बस डेपो मंजूर करणार, शेतकऱ्यांचा सन्मान निधी 15 हजार रुपये करणार, गोसीखुर्दचे पाणी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळण्यासाठी सर्वेक्षण करण्यास सांगितलेले असून तो अहवाल आला की शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल असे सांगितले. देसाईगंज शहर हे व्यापार नगरी असून या ठिकाणी औद्योगिक क्लस्टर सुरू केले जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी अरविंद सावकार पोरेड्डीवार, आ.कृष्णा गजबे, किशन नागदेवे, मुकेश खोब्रागडे, युनूस शेख आदींनी सभेत आपले विचार मांडत महायुतीच्या विजयाचा संकल्प करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन विनोद नागपूरकर यांनी, तर आभार प्रदर्शन विलास ढोरे यांनी केले.