‘वरद फेरो’ कंपनीसाठी आज पर्यावरणविषयक जनसुनावणी

6 गावांचे जनजीवन होणार प्रभावित

गडचिरोली : जिल्ह्याच्या औद्योगिक वाटचालीत आता आणखी एक पाऊल पुढे टाकले जात आहे. चामोर्शी तालुक्यात पुन्हा एका नवीन प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी आज (दि.17) जनसुनावणी घेतली जाणार आहे. मे.वरद फेरो अलॅायज् प्रा.लि. यांच्या स्पंज आयर्न आणि इतर लोहप्रक्रिया उद्योगासाठी चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीलगत असलेल्या मुधोली चक नं.2 आणि इतर काही गावांमधील 400 पेक्षा जास्त एकर जमिनीचे अधिग्रहण त्यासाठी करण्याचे नियोजन सुरू आहे.

या प्रकल्पामुळे ज्या 6 गावांना प्रदुषणाचा फटका बसू शकतो त्यात मुधोली चक-2, घनपूर (राई), जयरामपूर, कोनसरी, सोमनपल्ली आणि हळदीमाल या सहा गावांचा समावेश आहे. याशिवाय चामोर्शी नगरालाही काही प्रमाणात प्रदुषणाचा फटका सहन करावा लागू शकतो. आज होणाऱ्या पर्यावरणविषयक जनसुनावणीसाठी या सर्व गावांमधील नागरिकांना आपल्या शंका मांडण्यासाठी प्रदुषण नियंत्रण मंडळाने पाचारण केले आहे.

ही जनसुनावणी प्रकल्प होणाऱ्या गावात किंवा चामोर्शी एसडीओ कार्यालयात न ठेवता जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवल्याबद्दल संबंधित गावातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

कसा असणार हा लोहप्रकल्प?

गडचिरोलीच्या नियोजन भवनात सकाळी 11 वाजता ही जनसुनावणी होणार आहे. डीआरआय स्पंज आयर्न प्लांट, इंडक्शन फर्नेस, रोलिंग मिल, फ्लॅट प्रॅाडक्ट रोलिंग मिल, सेक्शन रोलिंग मिल, फोर्जिंग, पिकलिंग, ब्राईट बार, इंगोट कास्टिंग आणि कॅप्टिव पॅावर प्लान्ट तथा सबमर्ज्ड आर्क फर्नेस अशा विविध कामांसाठी असलेल्या या लोहप्रकल्पातून किती प्रमाणात प्रदुषण होऊ शकते, ते नियंत्रित करण्यासाठी कंपनीकडून कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत याची माहिती वरद फेरो अलॅायकडून दिली जाईल. याशिवाय बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या पर्यावरणविषयक शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न कंपनीच्या वतीने केला जाईल.