गडचिरोली : अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाकडून विविध आरोग्य मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. यातच पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद गडचिरोली व सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा कोठी येथील आठवडी बाजार परिसरात, तसेच गडचिरोली पोलीस दल व शालीनीताई मेघे रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने उपपोस्टे व्यंकटापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्य सुविधांविषयी जनजागृती करुन आरोग्य तपासणी आणि औषधोपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदर दोन्ही ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले होते.
कोठी येथील आरोग्य शिबिरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या डॉ.छाया ऊईके (स्री रोग तज्ञ), महिला व बाल रुग्णालयाच्या डॉ.मनिषा गेडाम (बालरोग तज्ञ), पोलीस रुग्णालय गडचिरोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील मडावी, डॉ.मनिष मेश्राम, शैलेश मानमोडे (फार्मसिस्ट), तसेच 113 बटा. सीआरपीएफचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक नारायण यांच्या नेतृत्वात तपासणी करण्यात आली. तसेच उपपोस्टे व्यंकटापूर येथे डॉ.रविंद्र इंगोले यांच्या नेतृत्वात नागरिकांची आरोग्य तपासणी, तर डॉ.सारंग डोंगरे, डॉ.प्रांजल नागोसे यांनी नागरिकांच्या नेत्र समस्यांविषयी तपासणी केली.
मौजा कोठी येथील मेळाव्यादरम्यान 107 नागरिकांची व उपपोस्टे व्यंकटापूर हद्दीतील सुमारे 100 नागरिकांची विविध आजारांबाबत तपासणी करून आवश्यकतेनूसार नागरिकांना मोफत औषधे उपलब्ध करुन देण्यात आली. यावेळी एकूण 36 नागरिकांना आवश्यकतेनुसार विविध रुग्णालयांच्या ठिकाणी पुढील तपासणीसाठी शिफारस करण्यात आली.
बालरोग तज्ञांकडून शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्ह्यात कार्यरत शहीद जवानांनी दिलेल्या बलिदानाबद्दल, सी-60 जवानांच्या शौर्याबद्दल व नागरी कृती उपक्रमांबद्दल मौजा कोठी येथील आठवडी बाजारात उपस्थित नागरिकांना विविध बॅनरच्या माध्यमातून माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
सदर आरोग्य शिबिरांच्या आयोजनासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सीआरपीफ कमांडंट जसवीर सिंग, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कोठीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. कार्तिक दळवी आणि उपपोस्टे व्यंकटापूरचे प्रभारी अधिकारी पोउपनि. राजू गड्डापोळ तथा पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.





























