Home दैनंदिन बातम्या गडचिरोलीत ‘मोगरा फुलला’चा सुरेल अभंग व भावगीत सोहळा

गडचिरोलीत ‘मोगरा फुलला’चा सुरेल अभंग व भावगीत सोहळा

गुरूवारी विद्यापीठात आयोजन

गडचिरोली : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जन्मवर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘मोगरा फुलला’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, 7 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता गोंडवाना विद्यापीठातील नवीन सभागृहात हा कार्यक्रम रंगणार आहे.

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकारातून राज्यभर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्याचा जागर केला जात आहे. त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘मोगरा फुलला’ हा संगीतमय कार्यक्रम सादर होत आहे. या कार्यक्रमाद्वारे संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवनचरित्र, त्यांच्या अभंगांमधील तत्त्वज्ञान आणि समाजाला दिलेला मानवतेचा संदेश प्रभावीपणे उलगडून दाखवण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात व्याख्याते गणेश शिंदे हे आपल्या प्रभावी निरूपणातून संतांच्या जीवनकार्याचा वेध घेणार आहेत, तर गायिका सन्मिता शिंदे आपल्या सुरेल आवाजात अभंग आणि भावगीतांची प्रस्तुती करून वातावरण भक्तिमय करणार आहेत.

बंधुभाव आणि सकारात्मक दिशा

आजच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या आणि तंत्रज्ञानप्रधान जीवनशैलीत माणूस आपल्या सांस्कृतिक व आध्यात्मिक मुळांपासून दूर जात असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत ‘मोगरा फुलला’सारखे कार्यक्रम समाजाला समतेचा, बंधुभावाचा आणि एकात्मतेचा संदेश देत सकारात्मकतेची दिशा दाखवतात. संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार आजच्या काळात अधिकच प्रेरणादायी ठरतात. तसेच, आधुनिकतेच्या प्रभावामुळे पारंपरिक संत साहित्यापासून दूर जात असलेल्या तरुण पिढीपर्यंत हे विचार पोहोचवण्याचे कार्य अशा कार्यक्रमांद्वारे प्रभावीपणे केले जाते. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक नव्हे, तर समाजप्रबोधनाचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.

या प्रेरणादायी आणि सुरेल कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी गडचिरोलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.