गडचिरोली : आखाती देशातील युद्धजन्य स्थितीनंतर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. मात्र नागरिकांकडून मागणी वाढल्यामुळे टंचाईसदृश परिस्थिती उद्भवली आहे. वास्तविक आजच्या स्थितीत जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर 3 लाख लिटरहून अधिक डिझेल आणि पेट्रोल शिल्लक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
विशेष म्हणजे युद्धजन्य स्थितीनंतर सुरूवातीला जिल्ह्यात दररोज 1 लाख 10 हजार लिटर पेट्रोलची मागणी होती. ती आता कमी होऊन दररोज 90 हजार लिटरवर आली आहे. मात्र ट्रॅक्टरने शेतीच्या मशागतीची कामे आणि सरकारी बांधकामांवरील वाहनांसाठी लागणाऱ्या डिझेलमुळे दररोज 2 लाख 25 हजार लिटरवरून डिझेलची मागणी वाढून ती 2 लाख 75 हजार लिटरवर गेली असल्याचे प्र.जिल्हा पुरवठा अधिकारी मनोज डहारे यांनी सांगितले. डिझेलअभावी शेतीची कामे प्रभावित होऊ नये यासाठी त्यांना प्राधान्याने डिझेल देण्याच्या सूचना पंपचालकांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
आजच्या स्थितीत जिल्ह्यातील सर्व पंप मिळून 3 लाख 75 हजार लिटर पेट्रोल आणि 3 लाख 10 हजार लिटर डिझेल शिल्लक असल्याचे डहारे यांनी सांगितले. काही पेट्रोलियम कंपन्यांकडे टँकरची संख्या कमी असल्यामुळे त्यांना डेपोतून पुरवठा करण्यास वेळ लागत आहे. त्यासाठी खासगी टँकर घेऊन पुरवठा सुरळीत करण्याची सूचना प्रशासनाकडून कंपन्यांना देण्यात आली आहे.
































