गडचिरोली : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत वर्धा–चंद्रपूर–गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार अरुण लखाणी यांनी सोमवारी (दि.1) चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्यमंत्री तथा निवडणूक प्रमुख पंकज भोयर, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री प्रा.डॉ.अशोक उईके, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडिया, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, आ.देवराव भोंगळे, आ.करण देवतळे, आ.किशोर जोरगेवार, माजी खासदार रामदास तडस, माजी आमदार तथा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.देवराव होळी, आमदार समीर कुणावार, भाजपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे आदींसह भाजप आणि महायुतीचे वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी अरुण लखाणी यांना शुभेच्छा देत वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीनही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विकासकामांना अधिक गती देण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील मतदारांचा मोठा पाठिंबा महायुतीच्या उमेदवाराला लाभेल आणि महायुतीचा विजय निश्चित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
वर्धा–चंद्रपूर–गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक येत्या 18 जून 2026 रोजी होत असून या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण 977 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
अरुणजी लखाणी यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने ते विजय संपादन करतील, असा निर्धार माजी खासदार डॉ.अशोक नेते यांनी व्यक्त केला.
































