गडचिरोली : येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या कारभाराची चौकशी करून कारवाई आणि बदली करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी काढण्यात आलेल्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेने गडचिरोलीकरांचे लक्ष वेधून घेतले. सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात केलेल्या या आंदोलनात कार्यकारी अभियंत्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.
लाझेंडा परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 च्या कार्यालयासमोर ही प्रतिकात्मक प्रेतयात्रा नेऊन निदर्शने करण्यात आली. साखरवाडेंना हटवा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला वाचवा, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला. गैरकारभार चव्हाट्यावर आणूनही कारवाई होत नसेल तर साखरवाडे हे शासनाचे ‘जावई’ आहेत काय? असा सवाल कात्रटवार यांनी उपस्थित करून शासन व प्रशासनावर हल्ला चढविला.
कोरची तालुक्यातील खोब्रागडी नदीवरील पूल कोसळण्याचे प्रकरण, मागील आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्ती व पुल दुरूस्तीची कामे, तसेच मागील 3 वर्षातील कामांच्या निविदा विक्री प्रकरणांची योग्य चौकशी करून कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा कात्रटवार यांनी दिला.
यावेळी यादव लोहंबरे, विनोद चापले, शाम झोडे, मोतीराम भुरसे, गोपाल मोंगरकर, जगन चापले, यादव चौधरी, बळीराम गेडाम, तानबा दजगाये, शुभम कुकडकर, भूषण लोहंबरे, भीमराव ठाकरे, चांगदेव कोहपरे, गणेश वाघमारे, पितांबर नैताम, नक्टू कलसर, राहुल ठाकरे, भूषण ठाकरे, शुभम समर्थ, प्रवीण म्हस्के, अजय संदोकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
































