धानोरा : डॉ.साळवे नर्सिंग कॉलेज तसेच शिवम इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी (डी.फार्मसी) चातगाव, ता.धानोरा यांच्यातर्फे आदिवासी दुर्गम क्षेत्र असलेल्या मौजा येरकड (ता.धानोरा) येथे “जागतिक नेत्रदान दिना”निमित्त मोफत रोगनिदान व औषधी वाटप शिबीर, तसेच नेत्रारोग्य व नेत्रदान संकल्प अभियान कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात 75 रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्धाटन डॅा.साळवे नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष डॉ.प्रमोद साळवे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत येरकडचे प्रशासक वासुदेव उसेंडी, तर प्रमुख पाहणे म्हणून ग्रामपंचायत अधिकारी जयंत मेश्राम, तसेच लालाजी जांगधुर्वे हे होते.
प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या अधिक्षिका निकिता सडमेक यांनी डोळ्यांचे आरोग्य व नेत्रदानाचा संकल्प याची रूपरेषा मांडली. उद्धघाटनपर मार्गदर्शनात डॅा.साळवे म्हणाले की, आज आरोग्याची समस्या ही फार मोठी समस्या म्हणून समोर येत आहे. विविध आजारांचे थैमान, पर्यावरणाची होणारी सततची हानी, वृक्ष कटाईत होत असलेली वाढ, महागडी व नकली औषधे आणि त्यांचा भडीमार, यामुळे मानवी आयुष्य रसातळाला जात आहे. सामान्य माणसाचे जीवन कष्टमय झाले आहे. या सर्वांचा परिणाम मानवी शरीरातील डोळ्यांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. नेत्रहानीमुळे माणसाचे जीवन अंधकारमय होत असल्याने अशा लोकांना नेत्रदान केल्यास त्यांच्या आयुष्यात नवीन पहाट उगवेल. आयुष्यात दुसरा जन्म झाल्याप्रमाणे त्यांना आनंद होईल. प्रत्येक व्यक्तीने याचे महत्व लक्षात घेऊन नेत्रदानाचा संकल्प करावा, त्यासाठी याचे चळवळीत रुपांतर होणे आवश्यक आहे. याकरीता डॉ.साळवे नर्सिंग कॉलेज व शिवम इन्स्टीट्युटचे विद्यार्थी नेत्रदान व नेत्रारोग्याचे अभियान राबविणार आहे, अशी महत्वपूर्ण माहिती डॅा.साळवे यांनी दिली.
येरकड ग्रामपंचायतचे प्रशासक वासुदेव उसेंडी म्हणाले, माणसाच्या आयुष्यात दृष्टी नसेल तर त्या जीवनाला काही अर्थ नसतो. अशा मूल्यवान जीवनाला नेत्रदान करून एक प्रकारे पुनर्जन्माची संवेदना निर्माण करून देतो. यामुळे नेत्रदानासाठी सर्वांनी संकल्प करून जनजागृती करू, असे आवाहन त्यांनी केले. जयंत मेश्राम यांनी डोळ्यांची निगा कशी राखावी यावर मार्गदर्शन केले. तसेच मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन आयुर्वेद उत्कर्ष विदर्भ प्रदेश नागपूरचे डॉ.अमित रामने यांनी केले. या कार्यक्रमासाठी अनिल मेश्राम , गुरुदेव शेडमाके, शुभांगी हलामी , स्विटी नरोटे, सानिया सडमेक, प्रशांत कोंडागोर्ला, पियुष नंदेश्वर, आकांक्षा आखाडे, मारिया गेडाम यांनी सक्रिय सहकार्य केले.
































