देसाईगंज : रामायण या महान धर्मग्रंथाचे रचयिता, आदिकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय ढिवर समाज मंडळ, बोळधा यांच्या वतीने महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव सोहळा भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या सोहळ्याच्या निमित्ताने माजी आमदार कृष्णा गजबे यांनी बोळधा येथील महर्षी वाल्मिकी सामाजिक केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन व अभिवादन करून आशीर्वाद घेतला. महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनकार्याचे स्मरण करत उपस्थित समाजबांधवांनी त्यांच्या विचारांचा आदर्श जपण्याचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
याप्रसंगी सुखदेव मेश्राम, मेघश्याम मेश्राम, सुरेश मेश्राम, श्रीराम मेश्राम, धनंजय मेश्राम यांच्यासह ढिवर समाज मंडळाचे अध्यक्ष, सचिव, संचालक मंडळाचे सदस्य, तसेच वाल्मिकी मत्स्यपालन सहकारी संस्था, बोळधा येथील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महर्षी वाल्मिकी जयंती उत्सवाच्या माध्यमातून समाजातील एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी आदिकवी महर्षी वाल्मिकी यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.
































