Home पब्लिक प्रॉब्लेम वडेट्टीवार यांचा बैठकीतून वनमंत्री गणेश नाईकांशी दूरध्वनीवर संवाद

वडेट्टीवार यांचा बैठकीतून वनमंत्री गणेश नाईकांशी दूरध्वनीवर संवाद

वन्यजीवांमुळे होणाऱ्या नुकसानीवर चर्चा

गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांत गेल्या 10 दिवसांत 5 नागरिकांचा मृत्यू झाला, दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यात हत्तींकडून शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या मजुरांचे गेल्या पाच महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. आवश्यक निधीअभावी निर्माण झालेल्या या समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावे यासाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काल गडचिरोलीतील पक्षाच्या बैठकीतून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना फोन लावून चर्चा केली.

यावेळी वडेट्टीवार यांनी वनमंत्र्यांना या परिस्थितीची माहिती देत यावर सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत पुढील 7 ते 8 दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन यावेळी वनमंत्री नाईक यांनी दिले. नागरिकांच्या सुरक्षेसह शेतकऱ्यांच्या नुकसानीवर आणि थकीत वेतनाच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी ही बैठक महत्वपूर्ण राहणार आहे.

जंगलांचे रक्षण करणाऱ्या नागरिकांचे जीव सुरक्षित ठेवणे, शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करणे आणि वनमजुरांना त्यांच्या हक्काचे वेतन वेळेत मिळवून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही होण्यासाठी तातडीने बैठक घेण्याची आणि आमच्यासोबत सविस्तर चर्चा करण्याची विनंती वडेट्टीवार यांनी वनमंत्र्यांना केली. त्यावर आठवडाभरात तशी बैठक लावण्याचे आश्वासन वनमंत्र्यांनी दिले.