गडचिरोली : जिल्ह्यातील 1 ते 19 वर्षे वयोगटातील बालके व मुला-मुलींच्या उत्तम आरोग्यासाठी, पोषणस्थिती सुधारण्यासाठी आणि जंतसंसर्गापासून त्यांचे रक्षण करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आज, दि.27 ऑक्टोबर रोजी ‘राष्ट्रीय जंतनाशक दिन’ मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच यातून सुटलेल्या बालकांसाठी 3 नोव्हेंबर 2026 रोजी ‘मॉप-अप दिन’ आयोजित करण्यात आला आहे.
या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या अध्यक्षतेखाली दुरभाष्य प्रणालीद्वारे जिल्हास्तरीय समन्वय समितीची आढावा व प्रशिक्षण झाले. या बैठकीत शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, आदिवासी प्रकल्प विभाग आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी समन्वय साधून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये व आकडेवारी
जिल्ह्यातील 1 ते 19 वयोगटातील एकूण 2,56,762 बालके व किशोरवयीन मुले-मुली यासाठी पात्र लाभार्थी आहेत. त्यात 1 ते 6 वर्षे (अंगणवाडीतील बालके) 1,03,768, वयोगट 6 ते 10 वर्षे मधील 54,487, वयोगट 11 ते 19 वर्षे मधील 98,507 लाभार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 3,853 बुथवर (2,328 अंगणवाडी केंद्र आणि 1,727 शाळा) ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यात 6 लाख अलबेंडाझोल गोळ्या उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रफुल्ल हुलके यांनी सांगितले.
जंतसंसर्गापासून बचावासाठी खबरदारी
दूषित माती व अस्वच्छतेमुळे जंतांचा प्रादुर्भाव होतो, ज्यामुळे कुपोषण, अशक्तपणा, रक्ताक्षय, पोटदुखी व इतर आजार उद्भवतात. यासाठी खालील सवयी पाळाव्यात.
* जेवणापूर्वी व शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे.
* भाजीपाला व फळे खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून घेणे.
* उकळून थंड केलेले पाणी पिणे.
* बाहेर जाताना नेहमी चपला किंवा बुटांचा वापर करणे.
* नखे नियमितपणे कापणे व उघड्यावर शौचास न जाता शौचालयाचाच वापर करणे.
जिल्ह्यातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये मोफत जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत.आपल्या पाल्याचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सर्व पालकांनी 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना जंतनाशक गोळी आवर्जून द्यावी आणि मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी केले आहे.
































