गडचिरोली : दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारूची वाहतूक, साठा आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाया करण्याचे पोलीस अधीक्षकांचे स्पष्ट निर्देश असताना आरमोरीत मात्र चक्क गोदामात विविध प्रकारची दारू साठवून ठेवली जात असल्याचा प्रकार सहायक पोलीस अधीक्षक तथा गडचिरोलीचे एसडीपीओ अनिकेत हिरडे यांच्या पुढाकाराने उघडकीस आला. यात विविध प्रकारची दारू आणि वाहनासह 15 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जी माहिती गडचिरोलीत बसून एसडीपीओंना मिळते ती आरमोरी पोलिसांना स्थानिक पातळीवर कशी मिळत नाही, की त्यांच्या आश्रयानेच हा अवैध दारूचा व्यवसाय सुरू होता, असा प्रश्न आरमोरीकरांना पडला आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिनांक 10 जूनच्या रात्री सहायक पोलीस अधीक्षक तथा एसडीपीओ गडचिरोली अनिकेत हिरडे यांना गोपनिय बातमीदाराकडून आरमोरीतील दारूसाठ्याची माहिती मिळाली होती. त्यात सुनील जिभकाटे रा.शेगाव टोली, आरमोरी हा आपल्या साथीदारांच्या मदतीने चारचाकी वाहनाने बाहेर जिल्ह्रातून अवैधरित्या देशी-विदेशी दारू आणून आरमोरी येथील बी.एस.एन.एल. टॉवरजवळील त्याच्या नावाने असलेल्या ईलेक्ट्रीक सामान ठेवलेल्या गोदामात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी व हातभट्टीच्या मोहा दारूचा अवैधरित्या साठा करून ठेवत असल्याची माहिती होती. त्या माहितीवरून हिरडे यांनी आरमोरी येथील पोलीस पथकाला कारवाई करण्याचे निर्देश दिले.
वरिष्ठांच्या निर्देशानुसार आरमोरी ठाण्याच्या पथकाने जाऊन पाहणी केली असताना 4 ते 5 इसम चारचाकी वाहन क्र. एम.एच. 34, ए. एम. 8969 या मधून काही बॉक्स काढून गोदामात ठेवताना दिसून आले. पण सदर गोदामाकडे पोलीस पथक येताना दिसून आल्याने काही इसम पळून गेले. परंतू पोलीस पथकास गोदामाच्या आत सुनील रामचंद्र जिभकाटे, (40 वर्ष), रा.शेगाव टोली, आरमोरी हा सापडला.
पोलीस पथकाने पंचासमक्ष चारचाकी वाहनाची व गोदामाची तपासणी केली असता, तिथे रॉयल स्टॅग डिलक्स विस्की, टायगर ब्रॅन्ड संत्री 5000, रॉकेट देशी दारू, रॉयल चॅलेंज प्रिमियम लेजर बियर, किंगफिशर स्ट्राँग बियर, लंडन पिलसनर स्टाँग बियर, तसेच हातभट्टी मोहा दारु अशा विविध प्रकारच्या देशी-विदेशी दारूचा साठा आढळून आला. दारूच्या वाहतुकीसाठी वापरलेली जुनी स्विफ्ट कार (अंदाजे किंमत रु.3,00,000 रुपये) असा एकूण 15 लाख 65 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी आरोपी सुनील जिभकाटे रा.शेगाव टोली, अजय दादाजी राऊत (रा.अंतरजी, ता.आरमोरी), राहुल राऊत, (रा.रामाळा, ता.आरमोरी), अजय राऊत (रा.रामाळा, ता.आरमोरी), सुभाष तुलावी (रा.दवंडी, ता.धानोरा), यांच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने एक दिवसांचा पीसीआर मंजूर केला. पुढील तपास पोउपनि. संतोष कडाळे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश, सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी ठाण्याच्या पथकाने केली. या कारवाईप्रमाणे आरमोरी शहर आणि तालुक्यातील इतर दारू अड्ड्यांवरही कारवाया कराव्या, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.
































