Home दैनंदिन बातम्या मंडळ अधिकारी, तलाठ्यानंतर तहसीलदारांचीही विकेट पडणार

मंडळ अधिकारी, तलाठ्यानंतर तहसीलदारांचीही विकेट पडणार

अवैध रेती उपसाप्रकरणी कारवाई

गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील वैनगंगा नदीच्या कोंढाळा-सिंड्राई घाटावर अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एका मजुराचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. या गंभीर घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तहसीलदारांना तडकाफडकी निलंबित केले. एवढेच नाही तर देसाईगंजच्या तहसीलदार प्रीती डुडूलकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आपल्यावरही अशी कारवाई होणार नाही ना, या धास्तीने अवैध रेतीउपसा होणाऱ्या तालुक्यांमधील तहसीलदारांना ग्रासले आहे.

कोंढाळा येथील कोंढाळा-सिंड्राई घाट परिसरात विलास महादेव ढकले (36 वर्ष, रा.जिल्हेवाडा, ता.देसाईगंज) यांचा ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैध वाहतूक करत असताना ट्रॅक्टर उलटून दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने जिल्हा भरारी पथकाची नियुक्ती करून घटनास्थळाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.

भरारी पथकाने केलेल्या स्थळ पाहणी अहवालासह उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, 10 जून 2026 नंतर संबंधित रेतीघाटावरील रेतीचा उपसा बंद करण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही त्या ठिकाणी अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले. तसेच या अवैध प्रकारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक महसूल यंत्रणेकडून अपेक्षित दक्षता घेण्यात आली नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

या निष्कर्षांच्या आधारे संबंधित क्षेत्रातील महसूल अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. त्यानुसार मंडळ अधिकारी अर्चना टिस्कुले आणि तलाठी महादास ठाकरे यांना निलंबित करण्यात आले. याशिवाय या प्रकरणातील प्रशासकीय जबाबदारी लक्षात घेऊन तहसीलदार प्रिती डुडूलकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांनी दिली.

जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले की, अवैध रेती खणन आणि वाहतुकीला पाठीशी घातल्या जाणार नाही. अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक सतर्कतेने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.