Home दैनंदिन बातम्या ‘प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी व्हावे’

‘प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी व्हावे’

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक

गडचिरोली : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-2026″ प्रभावी व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन कार्यक्रमाचा आराखडा, कार्यपद्धती आणि वेळापत्रकाची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहुल जाधव तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (अधिक बातमी खाली वाचा)

या बैठकीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाच्या दि.14 मे 2026 रोजीच्या निर्देशानुसार राज्यभर विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 1 ऑक्टोबर 2026 ही मतदार नोंदणीसाठी अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली आहे. या दिनांकापर्यंत 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व पात्र नागरिकांना मतदार म्हणून नोंदणीची संधी उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यात 20 ते 29 जून या कालावधीत आवश्यक तयारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच एन्ल्युमरेशन फॉर्मची छपाई पूर्ण करण्यात आली असून 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी भेट देऊन एन्ल्युमरेशन फॉर्म भरून घेणार आहेत. संबंधित माहिती बीएलओ ॲपद्वारे ऑनलाईन नोंदविण्यात येणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांतील एकूण 8 लाख 28 हजार 904 मतदारांच्या पडताळणीसाठी 16 लाख 57 हजार 808 एन्ल्युमरेशन फॉर्म छापण्यात आले असून त्यांचे वितरण सुरू आहे. जिल्ह्यात एकूण 91.48 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून 1 लाख 39 हजार 811 मतदारांच्या नोंदींमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी आढळल्या आहेत. या सर्व मतदारांकडून बीएलओ घरोघरी जाऊन आवश्यक माहिती व अर्ज संकलित करतील. त्याआधारे 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच दुबार नावे पडताळून आवश्यक ती कार्यवाही मतदार नोंदणी अधिकारी स्तरावर करण्यात येत आहे.

नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करून मतदार याद्या अधिक अचूक व त्रुटीमुक्त करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले. यावेळी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देत मतदार जनजागृतीमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.