गडचिरोली : बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत 29 ते 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट, तर उद्या आॅरेंज अलर्ट असल्याने संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज (दि.29) सुटी जाहीर केली आहे.
हवामान अंदाजानुसार, 29 जुलै रोजी कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव प्रामुख्याने पूर्व विदर्भात जाणवण्याची शक्यता आहे. 30 जुलै रोजी हा प्रभाव पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि कोकणात अधिक जाणवू शकतो. 31 जुलै रोजी खानदेशातील काही भाग तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी दिनांक 29 जुलै रोजी रेड अलर्ट, तसेच 30 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, बांडिया, इंद्रावती आदी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची तसेच नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी आज (बुधवार), दिनांक 29 जुलै रोजी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर केली आहे.
या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शासकीय व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था व इतर व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांनाही सुटी लागू राहणार आहे.
पावसाळ्यातील पूरपरिस्थिती आणि त्यातून उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) एक चमू गडचिरोलीत सज्ज आहे. त्यात दोन अधिकाऱ्यांसह 11 जवान आहेत. मोटारबोट आणि इतर जीवनरक्षक साहित्यांसह ही चमू कुठेही मदतीसाठी जाण्यासाठी तयार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे तसेच नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 तसेच लागू असलेल्या कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
































