Home पब्लिक प्रॉब्लेम गुरवळातील शेतकऱ्यांच्या उपोषणाला काँग्रेस नेते आ.वडेट्टीवार यांची भेट

गुरवळातील शेतकऱ्यांच्या उपोषणाला काँग्रेस नेते आ.वडेट्टीवार यांची भेट

अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार

गडचिरोली : प्रस्तावित विमानतळासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने राखी (गुरवळा) येथे सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणस्थळी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधला.

हा विषय मी विधानसभेतही मांडला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊ नका, ही माझी स्पष्ट मागणी आहे. विमानतळ उभारायचेच असेल, तर या परिसरातील पडीक जमिनीचा पर्याय तपासा, शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे अधिग्रहण करून त्यांच्या उपजीविकेवर घाला घालू नका, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली. या प्रश्नावर जिल्हाधिकारी, सरकार यांच्याकडे पाठपुरावा करू. शेतकऱ्यांच्या एवढ्या गंभीर प्रश्नावर पालकमंत्र्यांनी समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, असेही वडेट्टीवार म्हणाले.

शेतकऱ्यांनी काळजी करू नये. शासन निर्णय निघाला असला, तरी शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने त्यांच्या जमिनी घेण्यास आमचा विरोध राहील. गरज पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, पण शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीचा लढा थांबवणार नाही.

विकासाला आमचा विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करून त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणे मान्य नाही. विमानतळासाठी पडीक जमिनीचा पर्याय स्वीकारा आणि शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी वाचवा.
येणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.