Home दैनंदिन बातम्या कोटगलच्या जि.प.शाळेत राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे उद्घाटन

कोटगलच्या जि.प.शाळेत राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे उद्घाटन

निरोगी जिल्हा घडवा- सीईओ गाडे

​गडचिरोली : राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोटगल येथे जिल्हास्तरीय मोहिमेचे उत्साहात उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, शिक्षणाधिकारी रेरक उजागरे यांच्यासह आरोग्य व शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

या ​कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, अधिकारी आणि शिक्षकांनी स्वतः मुलांसमोर जंतनाशक गोळी खाऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला.

​शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सीईओ सुहास गाडे म्हणाले, “मुलांचे आरोग्य सुदृढ राहिले तरच जिल्ह्याची प्रगती शक्य आहे. ‘निरोगी जिल्हा, निरोगी गडचिरोली’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे आणि नियमितपणे जंतनाशक गोळी घेणे गरजेचे आहे.”

​याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी पोटात जंत झाल्यामुळे मुलांमध्ये अशक्तपणा, कुपोषण आणि रक्ताची कमतरता (ॲनिमिया) कशी निर्माण होते, याविषयी माहिती देत जंतांपासून बचावासाठी सविस्तर मार्गदर्शन केले.

​जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रफुल्ल हुलके यांनी मोहिमेच्या नियोजनाविषयी माहिती दिली. मोहिमेच्या दिवशी काही कारणास्तव गोळी घेण्यापासून वंचित राहिलेल्या किंवा गैरहजर राहिलेल्या मुलांसाठी 3 नोव्हेंबर रोजी ‘मॉप-अप राउंड’ राबवण्यात येणार असून, त्या दिवशी सर्व उर्वरित बालकांना जंतनाशक गोळी देऊन सुरक्षित केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

​या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अमित साळवे, पाथ फाउंडेशनच्या प्रतिनिधी श्रुष्टी पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजेश चिल्लमवार, शिक्षक स्कर कुद्रपवार, तुकाराम कोसरे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी उपस्थित होते.