Home दैनंदिन बातम्या जिल्ह्यातील मुलभूत समस्यांवर आजपासून ‘चरखे के पास चर्चा’

जिल्ह्यातील मुलभूत समस्यांवर आजपासून ‘चरखे के पास चर्चा’

शेतकरी संघर्ष कृती समितीचे आयोजन

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना अनेक मूलभूत व गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, युवक, महिला, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी, त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांचा वाचा फोडण्यासाठी आज दि.9 आॅगस्टपासून “चरखे के पास चर्चा” या लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.(अधिक बातमी खाली वाचा)

क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन असा आठवडाभर चालणारा हा लोकसंवाद गडचिरोलीतील राजीव गांधी भवन, इंदिरा गांधी चौक, येथे शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 5 यादरम्यान होणाऱ्या या लोकसंवादात खालील विषयांवर चर्चा होणार आहे.

🔸 सुपीक शेतजमिनींचे अधिग्रहण व शेतकऱ्यांचे प्रश्न.
🔸 एमआयडीसी, विमानतळ व इतर प्रकल्पांबाबत नागरिकांचे मत.
🔸 बेरोजगारी व रोजगार निर्मिती.
🔸 शासकीय कार्यालयांतील रिक्त पदे.
🔸 राज्य परिवहन (एसटी) बससेवेची दयनीय अवस्था.
🔸 रानटी हत्तींचा वाढता उपद्रव.
🔸 वनपट्टे आणि रखडलेले सिंचन प्रकल्प.
🔸 अपुऱ्या आरोग्य सुविधा.
🔸 खराब रस्ते व दळणवळणाच्या समस्या.
🔸 शेतकरी, शेतमजुर, महिला, युवक व विद्यार्थ्यांचे प्रश्न.
🔸 पिण्याचे पाणी, वीज व इतर मूलभूत सुविधा.
🔸 ग्राहकांना स्मार्ट मीटरची सक्ती करू नये.

वरील विषयांवरील लोकसंवाद कार्यक्रमास नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहून आपल्या सूचना, मते व समस्या मांडाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.