Home दैनंदिन बातम्या जिल्हा परिषदेच्या रक्तदान शिबिरात 41 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

जिल्हा परिषदेच्या रक्तदान शिबिरात 41 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

रक्तदानासाठी सरसावले वरिष्ठ अधिकारी

गडचिरोली : ‘विश्व आदिवासी दिन’ आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्रशासनातर्फे 14 ऑगस्ट रोजी आयोजित ‘भव्य रक्तदान शिबिरा’ला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषदेच्या वीर शहीद बाबुराव शेडमाके सभागृहात पार पडलेल्या या शिबिरात जिल्हा परिषदेच्या 37 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून आपली सामाजिक बांधिलकी जपली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग व आदर्श

या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः पुढे येऊन रक्तदान केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी स्वतः रक्तदान करून सर्वांपुढे एक आदर्श निर्माण केला. त्यांच्यासोबतच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, प्रकल्प संचालक राहुल काळभोर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चेतन हिवंज, गटविकास अधिकारी मंगेश आरेवार, सहाय्यक प्रशासन अधिकारी फिरोज लांजेवार, कार्यकारी अभियंता नारायण सरदार, ज्ञानदीप गहाणे, सुरज गेडाम, तनय निकुरे, तुषार पगाडे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वतः रक्तदान करून या राष्ट्रीय व सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.

वैद्यकीय पथकाचे सहकार्य

हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील रक्त संकलन केंद्राच्या वैद्यकीय टीमने विशेष परिश्रम घेतले. या पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.तनया पोटावी, रक्तकेंद्र तंत्रज्ञ स्वाती म्हरसकोल्हे, अधिपरिचारिका खेवले, समुपदेशक रीना गणवीर, सहाय्यक राजकुमार भगत, वाहन चालक बंडू कुंभारे तसेच प्रशिक्षणार्थी करिष्मा मोहूर्ले, चंदा लेनगुरे आणि तेजस पिलारे यांचा समावेश होता. या सर्वांनी एकत्रितपणे शिबीराचे यशस्वी नियोजन केले.

“रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान, वाचवुया एखाद्याचे प्राण!” या उक्तीला सार्थ ठरवत, रक्तदान करून राष्ट्रीय व सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, रक्तदाते आणि या संपूर्ण वैद्यकीय टीमचे जिल्हा परिषद प्रशासनातर्फे आभार व्यक्त करण्यात आले. भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांना प्रशासकीय कुटुंबाचा भक्कम पाठिंबा राहील, असा विश्वास यावेळी प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आला.