Home राजकीय घडामोडी भाजपच्या संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे

भाजपच्या संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे

राज्यमंत्री भोयर यांचा कार्यकर्ता संवाद

गडचिरोली : भाजपा ही कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभी असलेली संघटना आहे. संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने एकजुटीने व समन्वयाने काम करावे, असे आवाहन राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले. भारतीय जनता पक्ष गडचिरोलीच्या वतीने आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (अनुसुचित जनजाती मोर्चा) तथा माजी खासदार डॉ.अशोक नेते यांच्यासह आमदार डॉ.मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार कृष्णा गजबे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, नगराध्यक्ष ॲड.प्रणोती निंबोरकर, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, सदानंद कुथे, प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, शहराध्यक्ष तथा न.प. सभापती अनिल कुनघाडकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, कि.मो.जिल्हाध्यक्ष विलास भांडेकर, भाग्यवान खोब्रागडे, अनिल पोहनकर, आनंद भांडेकर, रेवनाथ कुसराम यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या राजकीय प्रवासातील कार्यकर्त्याच्या भूमिकेचा उल्लेख करताना डॅा.भोयर म्हणाले, “मी देखील तुमच्यासारखाच एक कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. आज ज्या ठिकाणी आहे, त्यामागे संघटनेची शिकवण, कार्यकर्त्यांची मेहनत आणि सातत्यपूर्ण परिश्रम आहेत. पक्षाचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आपल्या मेहनतीच्या बळावर पुढे जातो आणि निवडून येतो. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. गडचिरोली येथे येऊन आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे.” केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती सामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यकर्ता संवादादरम्यान उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील विविध प्रश्न, अडचणी, संघटनात्मक विषय, तसेच जनतेशी संबंधित समस्या मांडल्या. भोयर यांनी सर्वांचे म्हणणे जाणून घेत संबंधित प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यकर्ता संवादातून भाजपाच्या संघटनात्मक वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली असून, “कार्यकर्ता हीच पक्षाची खरी ताकद” या भावनेतून गडचिरोली जिल्ह्यात पक्षाचे कार्य अधिक जोमाने आणि व्यापकपणे पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन भास्कर बुरे यांनी केले.