
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे नैसर्गिक वैभव असलेल्या टिपागड या पर्यटनस्थळावर जाऊन मनसोक्तपणे तिथले नैसर्गिक सौदर्य न्याहाळणे ही पर्यटकांसाठी एक पर्वणीच असते. पण अनेक वेळा मौजेसाठी गेलेले पर्यटक सोबत नेलेल्या खाद्यपदार्थांचा कचरा तिथेच टाकून नकळतपणे तिथल्या निसर्गसौंदर्याला विद्रुप करतात. त्यामुळे भाजयुमो आणि सोबे टुरिझम (ट्रायबी टुर्स) यांच्या संयुक्त विद्यमान आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वात रविवारी (दि.23) टिपागडवर स्वच्छता अभियानाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
गडचिरोली आणि धानोरा येथील मिळून जवळपास दिडशे उत्साही युवक आणि निसर्गप्रेमींनी यात सहभाग घेतला. विशेष म्हणजे सकाळपासून सतत रिमझिम पाऊस सुरू असतानाही ठरल्याप्रमाणे आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांच्यासह सर्वांनी टिपागडपर्यंतचा प्रवास बाईकने केला. पायथ्याशी वाहने ठेवून तेथून पायी पहाडावर चढत गेल्यानंतर तिथल्या परिसरात पर्यंटकांनी टाकलेला विविध प्रकारचा कचरा एकत्र जमा करून त्याची विल्हेवाट लावली.
या उपक्रमानंतर सर्वांनी नैसर्गिक पद्धतीने बनविलेल्या भोजनाचा आस्वाद घेतला. या उपक्रमात भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह निसर्गप्रेमी नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यापूर्वी मूतनुरच्या पहाडावरही अशाच पद्धतीने स्वच्छता अभियान राबविले होते.
































