गडचिरोली : जपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थीनींना सर्पदंश झाल्यानंतर त्यांच्या उपचारासाठी झालेल्या विलंबामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यात धानोरा ते जपतलाई या रस्त्याच्या दुरावस्थेचा मोठा वाटा होता, हे स्पष्ट झाले असताना अजूनही त्या रस्त्याची स्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे अशाच पद्धतीने इतर रुग्णांचाही उपचारास विलंब होऊन बळी जावा, त्यानंतरच रस्त्याची स्थिती सुधारली जाणार, अशी प्रशासनाची भूमिका आहे का? असा सवाल महाराष्ट्र ट्रायबल अँड बॅकवर्ड पिपल्स अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष डॅा.प्रमोद साळवे यांनी केला आहे.
जपतलाई आश्रम शाळेतील सर्पदंशाची घटना अत्यंत दु्र्दैवी असून कधीही न भरून निघणारी ती हाणी आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ या प्रकरणी चौकशी करून दखल घेतली आणि अनेकांवर फौजदारी गुन्हेही दाखल केले. पण या घटनेत ज्याचे सर्वात मोठे योगदान आहे अशा रस्त्याच्या दुरावस्थेसाठी जबाबदार कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. जर हा रस्ता चांगला असता, खड्डे नसते तर मुलींना वेळीच वैद्यकीय उपचार मिळाला, आणि त्यामुळे कदाचित मुलींचा जीव वाचला असता, परंत् आज एवढे दिवस होऊनही त्या रस्त्याची स्थिती सुधारलेली नाही. महामार्ग प्राधिकरणासोबत प्रशासनाला पुन्हा मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे का, असा सवाल डॅा.साळवे यांनी केला आहे.
सर्पदंश प्रकरणातील मुलींना खरच न्याय द्यायचा असेल तर धानोरा जपतलाई मार्ग तात्काळ विशेष बाब म्हणून प्राधान्याने दुरुस्त करावा, एवढेच नाही तर जिथे-जिथे आश्रमशाळा आहेत तो रस्ता तालुका मुख्यालयाशी चांगल्या रस्त्याने जोडण्याचे अभियान प्रशासनाने, शासनाने सुरू करावे, म्हणजे अपघात किंवा आरोग्याशी संबंधित दुर्घटना घडल्यास रुग्णालयात तात्काळ नेणे शक्य होईल आणि जपतलाई घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, अशी मागणी डॅा.साळवे यांनी केली आहे.
































