भामरागड : भामरागड तालुक्यासह छत्तीसगडकडील भागात गेल्या दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे भामरागड लगत वाहणाऱ्या नद्यांना पुन्हा पूर आला आहे. पर्लकोटा नदीचे पाणी सोमवारी पुलावर चढल्यानंतर हळूहळू गावाच्या दिशेने आले. मुख्य चौकापर्यंत पाणी पोहोचल्यामुळे आधीच सावध झालेल्या नागरिकांनी आपले सामान सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. दरम्यान पुराच्या वेढ्यामुळे 50 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे.
आज सकाळपासून भामरागडमध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यातच पर्लकोटा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने नदीवरील पूल सोमवारी सकाळी पाण्याखाली गेला. पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. पूल पाण्याखाली गेल्याने भामरागडच्या पलीकडील अनेक गावांचा तालुका मुख्यालयाशी असलेला संपर्क खंडित झाला आहे. या गावांतील नागरिकांना बाजारपेठ, आरोग्य सेवा, शासकीय कार्यालये तसेच इतर अत्यावश्यक कामांसाठी भामरागड येथे येणे अडचणीचे झाले आहे.
गावात शिरलेले पुराचे पाणी काही घरांमध्येही शिरले आहे. तालुका प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नदी-नाले व पुलांवरून पाणी वाहत असताना जीव धोक्यात घालून प्रवास करू नये, असे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, परिस्थितीनुसार आवश्यक उपाययोजना करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.
दुसऱ्यांदा पूरपरिस्थिती, नागरिक हतबल
भामरागड तालुक्यात 30 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराने शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. घरातील अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक साहित्य पाण्यात वाहून गेल्याने अनेक कुटुंबांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता. आता पुन्हा तशी परिस्थिती उद्भवणार नाही ना, या भितीने नागरिकांना ग्रासले आहे. मात्र पावसाने विश्रांती घेण्यासोबत पाणीही हळूहळू कमी होत असल्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
































