Home दैनंदिन बातम्या माता व गर्भातील बाळाच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत

माता व गर्भातील बाळाच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत

दोषींवर कारवाईची अनेकांची मागणी

गडचिरोली : चामोर्शी येथील प्रसुती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. समितीमार्फत या प्रकरणातील सर्व संबंधित बाबींची सविस्तर तपासणी करण्यात येत असून, चौकशी अहवालातील निष्कर्षांनुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी दिली आहे. दरम्यान उपचारास विलंब करणाऱ्या चामोर्शी रुग्णालयातील दोषी डॅाक्टरांवर कारवाई करण्याची मागणी आझाद समाज पक्ष आणि माजी पं.स.सदस्य अमिता मडावी यांच्यासह मृतांच्या कुटुंबियांनी केली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, जिजा हंसराज सातार (27 वर्ष), रा.चामोर्शी यांना 23 ऑगस्ट रोजी प्रसुतीसाठी सकाळी 5 वाजता ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत सुरुवातीला प्रसुती ग्रामीण रुग्णालयात होणे शक्य असल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर सकाळी सुमारे 9 वाजता करण्यात आलेल्या पुढील तपासणीत स्वाभाविक प्रसुतीस अडचणी निर्माण होत असल्याचे तसेच प्रसुती गुंतागुंतीची होण्याची शक्यता असल्याचे आढळून आले. गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके मंद असल्याचेही निदर्शनास आल्याने गर्भवती मातेस पुढील विशेष उपचारासाठी सकाळी 11 वाजता महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे संदर्भित करण्यात आले. संदर्भनादरम्यान रुग्णवाहिकेसोबत वैद्यकीय अधिकारी व परिचारिका उपस्थित होते.

महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे तपासणी केली असता मातेची प्रकृती गंभीर व गुंतागुंतीची असल्याचे तसेच बाळाचे डोके अडकल्याची स्थिती असल्याचे आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली. त्यामुळे तातडीने आवश्यक वैद्यकीय उपचारांतर्गत प्रसुती करण्यात आली. मात्र त्यावेळी बाळ मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले.

प्रसुतीनंतर मातेला अतिरक्तस्राव सुरू झाल्याने तिची प्रकृती अधिक गंभीर झाली. संबंधित तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आवश्यक उपचार करण्यात आले. रुग्णास रक्त तसेच चार युनिट एफएफपी (फ्रेश फ्रोजन प्लाझ्मा) देण्यात आले. उपचारादरम्यान रुग्णाची प्रकृती आणखी खालावल्याने तिला इंट्युबेशन करण्यात आले. पुढील विशेष उपचारासाठी सायंकाळी 7.30 वाजता सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत आवश्यक उपचार तसेच सोनोग्राफी करण्यात आली. मात्र, उपचारादरम्यान रात्री 9.50 वाजता मातेचा मृत्यू झाल्याचे डॉ.वर्षा लहाडे यांनी कळविले.

दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करा

चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात अनेक तास ताटकळत असताना वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने रुग्णावर उपचार होण्यास विलंब झाला. गरोदर महिला नॅार्मल अवस्थेत होती. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे टाईमपास होऊन महिलेची प्रकृती बिघडली. चामोर्शी रुग्णालयात सिझर होत असताना वैद्यकीय अधिकाऱ्याने हात झटकून रेफर का केले, चामोर्शी रुग्णालयात केवळ 1 दिवस सोनोग्राफी का करतात, इतर दिवस डॉ.देऊरी आपल्या खासगी क्लिनिकला रुग्णाना बोलवून सोनोग्राफी करायला लावतात. त्यामुळे चामोर्शी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॅा.प्रवीण किलनाके यांच्यासह डॅा.देऊरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून खासगी सोनोग्राफी सेंटरचा परवानाही निलंबित करावा अशी मागणी आझाद समाज पक्षाने निवेदनाद्वारे, तर अमिता मडावी यांनी मृताच्या कुटुंबियांसह पत्रकार परिषद घेऊन केली.

दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित परिवारास आर्थिक मदतीसाठी पालकमंत्री यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी मागणी घेऊन आझाद समाज पक्षाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांना निवेदन देऊन केली.