गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पध्दतीच्या शेतीत बदल करून त्यांना आधुनिक शेतीची प्रेरणा मिळावी यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांची कृषीदर्शन सहल आयोजित करण्यात आली आहे. पोलीस दलाच्या खर्चातून आयोजित या सहलीत 37 शेतकरी रवाना झाले. पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या शेतकऱ्यांच्या वाहनाला रवाना करण्यात आले. या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी.जे. प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्याच्या दुर्गम भागात शेतीमधुन प्राप्त होणारे उत्पन्न तुटपुंजे असल्याने त्यांच्या आर्थिक विकासाला मर्यादा येऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीला बगल देत विविध पद्धतीने अत्याधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन तेथील परिस्थितीची, आधुनिक शेती व उपकरणांची पाहणी करतील व त्या ज्ञानाचा वापर करून आपल्या पारंपरिक शेती पध्दतीत बदल करून आर्थिक प्रगती साधतील, या उद्देशाने पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली 37 शेतकऱ्यांच्या सहलीचे आयोजन केले. पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट कृषी समृद्धी अंतर्गत आयोजित ही 17 वी कृषीदर्शन सहल आहे.
यापूर्वी झालेल्या 16 कृषी दर्शन सहल व अभ्यास दौऱ्यांमध्ये दुर्गम भागातील विविध उपविभागातून एकुण 738 महिला व पुरुष शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या सतराव्या सहलीमध्ये गडचिरोली, पेंढरी कॅम्प कारवाफा, धानोरा व कुरखेडा उपविभागातील पोस्टे / उपपोस्टे/ पोमकें हद्दीतील 37 शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या सहलीदरम्यान सहभागी शेतकरी बडनेरा, अकोला, शेगाव, जळगाव, वेरुळ, राहुरी, पैठण, संभाजीनगर, परभणी, यवतमाळ, वरोरा, घातखेड येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच विविध शेती प्रक्षेत्र यांना भेटी देणार आहे. तसेच नागपूर येथील लिंबुवर्गीय संशोधन केंद्राला भेट देणार असून हिंगोली येथील प्रगतशिल शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. त्याचप्रमाणे शेतीविषयक अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञान जाणुन घेणार आहेत. यामुळे ते प्रगत तंत्रज्ञानाचे अनुभव आपल्या शेती व्यवसायामध्ये वापरून आपली आर्थिक उन्नती साधुन जीवनमान उंचावतील, अशी आशा केली जात आहे.
ही सहल दि.29 सप्टेंबर ते 6 आॅक्टोबर पर्यंत एकूण 8 दिवस राहणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व पोस्टे/ उपपोस्टे/ पोमकेंचे प्रभारी अधिकारी, तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि.चंद्रकांत शेळके, पोस्टे धानोराचे पोउपनि.अजय कोरडे व पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.
































