Home पब्लिक प्रॉब्लेम भामरागडवासियांना ‘लॅायड्स’कडून ब्लँकेट, कपडे व शिधा किटचे वाटप

भामरागडवासियांना ‘लॅायड्स’कडून ब्लँकेट, कपडे व शिधा किटचे वाटप

पूरस्थिती निवळल्यानंतर मदतीचा हात

भामरागड : सलग चार दिवसांच्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या भामरागड तालुक्यात संकटाच्या काळात लॅायड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमिटेडने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत आरोग्यसेवा दिला. आता पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करत कपडे, ब्लँकेट, शिखा किटचे वाटप केले.

भामरागडमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर लॅायड्सचे एम.डी. प्रभाकरण यांनी तातडीने विशेष वैद्यकीय पथक भामरागडला पाठवविले होते. पूरामुळे भामरागडचा बाहेरील जगाशी संपर्क तुटलेला असताना प्रतिकूल परिस्थितीत या वैद्यकीय पथकाने भामरागड ग्रामीण रुग्णालयात डॉ.कन्नाके यांच्यासोबत राहून पाच दिवस आरोग्यसेवा दिली.

नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा

पूरस्थितीमुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले, घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले. वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था ठप्प असल्याने नागरिकांसमोर मोठे संकट निर्माण झाले होते. या संकटात झालेल्या नुकसानाची थोडी भरपाई म्हणून पूर ओसरल्यानंतर मदतीच्या दुसऱ्या टप्प्यात किटचे वाटप लॅायड्सकडून करण्यात आले.

पुराचे पाणी ओसरल्यानंतर नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लॅायड्सने पुन्हा मदतीचा हात पुढे केला. पूरग्रस्त कुटुंबांना ब्लँकेट, चादरी, कपडे, तांदूळ, डाळ, तेल, मीठ तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या शिधा किटचे वाटप करण्यात आले. पुराच्या पाण्यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झालेल्या अनेक कुटुंबांना या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला.

आरोग्यसेवेपासून जीवनावश्यक वस्तूंपर्यंत संकटाच्या प्रत्येक टप्प्यावर मदतीला धावून येत लॅायड्सने ‘संकटात माणुसकीची साथ’ या भावनेचा प्रत्यय दिला. बी.प्रभाकरण यांच्या पुढाकारातून लॅायड्सच्या पथकाने दाखविलेली ही तत्परता आणि सामाजिक बांधिलकी पूरग्रस्त भामरागडकरांसाठी आधार देणारी ठरली आहे.