अहेरी : दोन बहिणींसह एकूण 5 अल्पवयीन विद्यार्थिनींशी लैंगिक चाळे करणाऱ्या भामरागड तालुक्यातील कुकामेटाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक रविंद्र उस्तुजी गव्हारे (43 वर्ष) याला 5 वर्षांचा सश्रम कारावास आणि विविध कलमान्वये 70 हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. अहेरीच्या अपर जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी हा निकाल दिला.
मार्च 2025 मध्ये कुकामेटाच्या एक शिक्षकी शाळेत हा प्रकार घडला होता. मुख्याध्यापक गव्हारे हा 9 ते 11 वर्ष वयोगटातील (वर्ग 3 ते 5 मध्ये शिकणाऱ्या) विद्यार्थीनींना आपल्या कक्षात एकटे बोलवून लैंगिक चाळे करत होता. हा प्रकार कोणाला सांगितल्यास मारण्याची आणि शाळेतून काढून टाकण्याची धमकी देत होता.
आदिवासी समाजातील पीडित दोन बहिणींनी शाळेत जाण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या आईने कारण विचारले तेव्हा घाबरलेल्या मुलींनी रडत हा प्रकार आईला सांगितला. त्यामुळे त्यांच्या आईने लाहेरी उपपोलीस स्टेशनला या प्रकाराची तक्रार केली. दरम्यान शाळेतील इतरही काही मुलींशी गव्हारे याने असेच चाळे केल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे लाहेरी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून मुख्याध्यापक गव्हारे याला अटक करण्यात आली.
भामरागडचे तत्कालीन एसडीपीओ अमर मोहिते यांनी या प्रकरणाचा तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. न्यायालयाने साक्ष आणि पुराव्यांच्या आधारे आरोपी मुख्याध्यापक रविंद्र गव्हारे याला भारतीय न्याय संहितेच्या कलम 74 अंतर्गत 5 वर्षांचा कारावास आणि 25 हजार दंड, कलम 75 (2) अंतर्गत 3 वर्षांची शिक्षा व 25 हजार दंड, धमकी दिल्याप्रकरणी बीएनएस कलम 351 (2) (3) अंतर्गत 2 वर्षांची शिक्षा, तर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार 3 व 2 वर्षांची शिक्षा तथा 20 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा एकाचवेळी भोगायच्या आहेत.
या प्रकरणात सरकारतर्फे अॅड.अरुण मसराम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.
































