गडचिरोली : जून ते सप्टेंबर हे पावसाळ्याचे 4 महिने संपल्यानंतर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. भामरागड वगळता कोणत्याही तालुक्यात पावसाने 100 टक्के सरासरी गाठलेली नाही. गेल्यावर्षी या चार महिन्यात 117.5 टक्के बरसलेला पाऊस यावर्षी जेमतेम 84.3 टक्क्यांपर्यंत मर्यादित झाला. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे ही स्थिती आली असून त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत सर्वांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
जिल्ह्यात यावर्षी पडलेल्या पावसावर एक नजर टाकल्यास सर्वात कमी पाऊस चामोर्शी तालुक्यात, अर्थात सरासरीच्या जेमतेम 52.6 टक्के झाला आहे. त्याखालोखाल गडचिरोली तालुक्यात 62.6 टक्के आणि मुलचेरा तालुक्यात 64.5 टक्के झाल्याची नोंद घेण्यात आली. म्हणजे 75 टक्केपेक्षा कमी पावसाची स्थिती या तीन तालुक्यात आहे. उर्वरित तालुक्यात 75 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी तो समाधानकारक नाही. त्यात धानोरा तालुक्यात सरासरीच्या तुलनेत 76.9 टक्के, देसाईगंज 93.3 टक्के, आरमोरी तालुक्यात 81.5 टक्के, कुरखेडा तालुक्यात 85.1 टक्के, कोरची तालुक्यात 83.5 टक्के, अहेरी तालुक्यात 88.7 टक्के, सिरोंचा तालुक्यात 96.6 टक्के आणि एटापल्ली तालुक्यात 76.9 टक्के पाऊस झाला. केवळ भामरागड तालुक्यात पावसाने सरासरी गाठत 102.9 टक्के हजेरी लावली.
कमी पावसाचा फटका हलक्या धानाला बसला आहे. पावसाची गरज असतानाच्या काळात पाऊस लांबल्याने धानाचे पीक अपेक्षित प्रमाणात होणार नाही. प्रशासनाने केवळ गडचिरोली आणि चामोर्शी या दोनच तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती दाखवली असली तरी अंतिम अहवालानंतर दुष्काळसदृश स्थिती असणाऱ्या तालुक्यांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष म्हणजे दुष्काळी स्थितीचा अहवाल देताना तालुकानिहाय पावसाचे प्रमाण पाहण्याऐवजी मंडळनिहाय पडलेला पाऊस पाहिल्यास कमी पावसाचा फटका बसूनही लाभापासून वंचित असलेल्या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी स्थितीचा लाभ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
































