गडचिरोली : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम, 2006 अंतर्गत वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दाव्यांच्या निपटार्याला गती देण्यासाठी धानोरा तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियाना’तंर्गत विशेष शिबिरांना बुधवारी (दि.7 ऑक्टोबर) पासून प्रारंभ झाला आहे. तालुक्यातील सर्व 61 ग्रामपंचायतींमध्ये 21 ऑक्टोबर पर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
पहिल्या दिवशी मौजा सालेभट्टी, रांगी, पुसटोला, आंबेझरी (दराची), पन्नेमारा आदी ठिकाणी नवीन वनहक्क दावे सादर करणे व दुरुस्ती प्रस्ताव गोळा करण्यासंबंधी विशेष शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. मौजे पन्नेमारा येथील शिबिरात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उपस्थित राहून वनहक्काबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. या सर्व शिबिरांना वनजमिनीवर वहिवाट असलेल्या नागरिकांचा व अतिक्रमणधारकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
शासन परिपत्रक व जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार पात्र दावेदारांना वनहक्काचे पट्टे देण्याच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी ही कालबद्ध मोहीम हाती घेण्यात आली आहे. यापूर्वी वितरित करण्यात आलेल्या वनपट्ट्यांमधील त्रुटी किंवा दुरुस्तीसाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करणे, तसेच नवीन दावे परिपूर्ण स्वरूपात स्वीकारणे, हे या शिबिरांचे मुख्य उद्दिष्ट आहे.
प्रशासकीय यंत्रणा मैदानात
गावागावात आयोजित या शिबिरांमध्ये महसूल, वनविभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित होते. यामध्ये संबंधित मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक), महसूल सेवक (कोतवाल), वनपाल, वनरक्षक तसेच पोलीस पाटील, ग्रामस्तरीय वनहक्क समितीचे अध्यक्ष, सचिव आणि ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित राहून दावेदारांचे अर्ज व पुरावे तपासणीचे काम करत आहेत.
तहसीलदार गणेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधित गावांमध्ये दवंडी देऊन व्यापक जनजागृती करण्यात येत असून, पात्र वनहक्क दावेधारकांनी विहित कागदपत्रांसह शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहून आपले दावे वेळेत सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
































