Home क्राईम आरमोरी-चामोर्शीत गोवंशांसह दारू वाहतुकीचे वाहन पकडले

आरमोरी-चामोर्शीत गोवंशांसह दारू वाहतुकीचे वाहन पकडले

कोरचीतील मटका अड्ड्यावरही धाड

गडचिरोली : अवैधरित्या गोवंशीय जनावरांची आणि देशी-विदेशी दारुची वाहतूक तथा जुगार खेळणा­ऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवायांमुळे लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरमोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंशीय जनावरांची, चामोर्शी पोलिसांच्या हद्दीत देशी-विदेशी दारुची वाहतूक, तर कोरची पोलिसांच्या हद्दीत मटका जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक आरमोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्रीची गस्त करीत असताना ठाणेगावकडून गडचिरोली शहराकडे येणाऱ्या एका आयशर कंपनीच्या ट्रकमध्ये अवैधरित्या गोवंशीय जनावरे नेली जात असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली. सदर माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व आरमोरीच्या पोलीस पथकांनी देऊळगाव जि.प.शाळेजवळ सापळा रचुन पाळत ठेवली असता, एक लाल रंगाचा आयशर ट्रक येताना दिसला. त्या वाहनाला थांबवून तपासणी केली असता त्यात 25 गाय-बैल (किंमत 3 लाख 18 हजार) आढळले. त्या गुरांसह ट्रक मिळून 15 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे त्या गुरांपैकी 2 गाई आणि 1 बैल मृतावस्थेत होते. याप्रकरणी आरोपी योगेश आनंदराव मडावी (35 वर्ष), रा.देवरी, जि.गोंदिया आणि प्रमोद राजकुमार मोहबे (43 वर्ष), रा.कुंभार टोली, जि.गोंदिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत कोरची येथील इसम क्षीरसागर नेवारे यांच्या घराशेजारील धनराज मडावी यांच्या झोपडीमध्ये छत्रपती बांगरे आणि हमीदखॉ पठाण नावाचे दोन इसम कल्याण, मनिपूर नावाचे वरली सट्टा मटक्यावर आकडे लाऊन पैशांची खायवाडी करीत असल्याचे आढळले. छत्रपती बांगरे याच्या सांगण्यावरुन ते मटक्यावर खायवाडी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्या ठिकाणी 5010 रुपये रोख व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोनि.दीपक डोंब करीत आहेत.

यासोबतच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला चेतनसिंग चंदेल रा.नागपूर हा एम.एच.36 एच 1399 या इनोव्हा या चारचाकी वाहनाने नागपूर जिल्ह्यातून ब्रम्हपुरीमार्गे देशी-विदेशी दारुची अवैधरित्या वाहतूक करुन गडचिरोली जिल्ह्रातील चिल्लर विक्रेत्यांना पुरवठा करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार खरपुंडी नाका ते इंदिरा गांधी चौक परिसरात सापळा रचला होता. मात्र थांबण्याचा इशारा केल्यानंतर ते वाहन न थांबता चामोर्शी मार्गाने भरधाव वेगाने पळून गेले. पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून देवडी बसस्टॉप जवळ नाकाबंदी करून त्याला पकडले.

पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारूचे 21 खरड्याचे बॅाक्स (किंमत 4 लाख), तसेच इनोव्हा वाहन आणि चालकाचा मोबाईल असा 9 लाखांचा ऐवज जप्त केला. हा मुद्देमाल गडचिरोलीतील प्रमोद मेश्राम याच्या सांगण्यावरुन वाहतूक केला जात असल्याने चेतनसिंग बबुसिंग चंदेल, रा.मानेवाडा रोड, नागपूर, आणि प्रमोद मेश्राम, रा.गडचिरोली या दोघांविरूद्ध चामोर्शी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउपनि.शाहू दंडे करीत आहे.

या कारवाया पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. अरुण फेगडे, आरमोरीचे पोनि.सचिन झनक, कोरचीचे पोनि.दीपक डोंब, चामोर्शीचे पोनि.महादेव ढाकणे यांच्या नेतृत्वात करण्यात आल्या.