Home राजकीय घडामोडी शिक्षण, कौशल्य विकास व रोजगार निर्मितीला प्राधान्य देणार

शिक्षण, कौशल्य विकास व रोजगार निर्मितीला प्राधान्य देणार

पदवीधर मेळाव्यात कोहळेंची ग्वाही

गडचिरोली : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस- रिपाइं- पीरिपा महायुतीचे उमेदवार सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांच्या प्रचारार्थ गडचिरोली येथील यमुना फंक्शन हॉलमध्ये आयोजित पदवीधर मेळाव्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिक्षण, कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती तसेच गडचिरोली शहर व जिल्ह्याच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर यावेळी सुधाकर कोहळे यांच्यासह वक्त्यांनी विचार मांडले.

या मेळाव्याला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आमदार डॉ.नामदेव उसेंडी, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे, शिक्षक परिषदेचे संतोष सुरावार, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, शहराध्यक्ष तथा न.प.बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे, गडचिरोली तालुकाध्यक्ष दतु सूत्रपवार, धानोरा तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, आष्टी तालुकाध्यक्ष राकेश सरकार यांच्यासह नगरसेवक, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने पदवीधर मतदार उपस्थित होते.

पदवीधरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करणार : कोहळे

यावेळी महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी पदवीधर मतदारांशी संवाद साधताना आपल्या आगामी कार्याची दिशा स्पष्ट केली. पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यास शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास आणि शैक्षणिक संस्थांच्या विविध प्रश्नांना प्राधान्य देत प्रभावीपणे पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातील युवक उच्चशिक्षित होण्याबरोबरच रोजगारक्षम झाला पाहिजे, यावर भर देत त्यांनी शैक्षणिक विकास, स्किल डेव्हलपमेंट आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला.

सुधाकर कोहळे अभ्यासू व सक्षम नेतृत्व : डॉ.नेते

मेळाव्यात मार्गदर्शन करताना माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी सुधाकर कोहळे यांच्या कार्यक्षमतेवर आणि अभ्यासू वृत्तीवर विश्वास व्यक्त केला. ते सुशिक्षित, अभ्यासू आणि सक्षम व्यक्तिमत्त्व आहे. पदवीधर मतदारसंघातील विविध प्रश्नांची जाण असलेल्या नेतृत्वाची आज आवश्यकता आहे. पदवीधरांचे प्रश्न प्रभावीपणे सभागृहात मांडून त्यांना न्याय देण्यासाठी कोहळे यांच्यासारख्या कार्यक्षम प्रतिनिधीला संधी मिळणे महत्त्वाचे आहे, असे डॉ.नेते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मेळाव्याची सांगता राष्ट्रगीताने झाली.