Home दैनंदिन बातम्या खरीपाच्या आधारभूत धान खरेदीसाठी टीडीसीच्या 54 खरेदी केंद्रांना मंजुरी

खरीपाच्या आधारभूत धान खरेदीसाठी टीडीसीच्या 54 खरेदी केंद्रांना मंजुरी

20 केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू

20 केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली आहे

गडचिरोली : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम 2026-27 साठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत 54 धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी सध्या 20 केंद्रांवर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. पात्र धान उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित केंद्रावर नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाने केले आहे.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या आदेशानुसार कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा आणि घोट या उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत खरेदी केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. सध्या भाडभिडी, कुरखेडा, गेवर्धा, सोनसरी, शिरपूर, मध्यवर्ती गोदाम आरमोरी, कुरुंडीमाल, उराडी, अंगारा, मध्यवर्ती गोदाम पोटेगाव, मध्यवर्ती गोदाम नवेगाव-गडचिरोली, तसेच कोरची, कोटगुल, मसेली, पुराडा, मालेवाडा, धानोरा, मुरुमगाव, रांगी आणि कारवाफा या 20 केंद्रांवर नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.

नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित शासकीय धान खरेदी केंद्रावर स्वतः उपस्थित राहावे. आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा उतारा, आधारसंलग्न मोबाइल क्रमांक आणि इतर आवश्यक कागदपत्रे केंद्रावर सादर करावीत. शासनाने निर्धारित केलेल्या ‘BeAM’ पोर्टलवर शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात येणार आहे.

धान खरेदीचे वेळापत्रक आणि शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराची माहिती संबंधित खरेदी केंद्र व कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. सर्व पात्र धान उत्पादक शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक सोपान संभारे यांनी केले आहे.