गडचिरोली : जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतीसमोर गंभीर संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामात भाजीपाला, गहू, हरभरा यासह कमी पाणी लागणाऱ्या डाळवर्गीय व तृणधान्य पिकांच्या लागवडीला परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यामुळे शेतकऱ्यांना रोजगाराची संधी मिळण्यासोबतच स्थानिक बाजारपेठेत भाजीपाल्याची उपलब्धता कायम राहून संभाव्य महागाईवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यात अल-निनोच्या प्रभावामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जलसंधारण आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जिल्ह्यात कमी पावसामुळे दोन तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असले, तरी उर्वरित 10 तालुक्यांतील शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात भातपिकाच्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या तालुक्यांनाही दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी करण्यात आली.
रब्बी हंगामात अनेक भागांतील शेतकरी भात आणि मका पिकांची लागवड करतात. या पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. यंदाची पाणीटंचाई लक्षात घेता अशा पिकांचे उत्पादन घेणे अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. मात्र, त्याऐवजी भाजीपाला, गहू, हरभरा तसेच कमी पाणी लागणाऱ्या डाळवर्गीय आणि तृणधान्य पिकांची लागवड केल्यास उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करता येईल.
शेतकऱ्यांच्या हाताला मिळेल काम
दुष्काळी परिस्थितीत शेतीतील उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. अशावेळी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्रोत्साहन दिल्यास शेतकऱ्यांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होईल. तसेच जिल्ह्यात भाजीपाल्याचे उत्पादन घटल्यास बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता असून, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसू शकतो. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचा विचार करून रब्बी हंगामातील भाजीपाला व कमी पाणी लागणाऱ्या पिकांच्या लागवडीस परवानगी द्यावी. तसेच उर्वरित 10 तालुक्यांनाही दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, तालुकाध्यक्ष कुणाल चिलगेलवार, चेतन गड्डावार, हिमांशू खरवडे, विकास देशमुख, काव्या वालदे, सुजल सोरते, पांडुरंग हुलके, महेंद्र भोयर, तेजराम कोटगले, कुसमाकर भोयर व शेतकरी उपस्थित होते.
































