Home महिला विश्व दुष्काळी स्थितीचा परिणाम पाहता महिलांसाठी विशेष पॅकेज द्यावे

दुष्काळी स्थितीचा परिणाम पाहता महिलांसाठी विशेष पॅकेज द्यावे

राष्ट्रवादी महिला काँग्रेसची मागणी

पत्रपरिषदेत बोलताना फौजिया खान, सोबत विद्या चव्हाण, अतुल गण्यारपवार
दुष्काळग्रस्त भागातील महिला परिस्थिती मांडताना

गडचिरोली : राज्यात दुष्काळाच्या झळा अतिशय तीव्र आहेत. या दुष्काळाच्या झळा केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर शेतकरी, शेतमजूर महिलांनाही मोठ्या प्रमाणावर सहन कराव्या लागणार आहे. त्यामुळे या स्थितीत महिलावर्गासाठी शासनाने विशेष पॅकेज द्यावे आणि दुष्काळी स्थितीत पाण्याचे नियोजन करताना महिलांना त्यात स्थान द्यावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री डॅा.फौजिया खान यांनी व्यक्त केली.

गडचिरोलीत महिलांची जनसंवाद बैठक घेऊन दुष्काळी स्थितीत वेगवेगळ्या भागातील महिलांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर डॅा.फौजिया खान प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासोबत 50 टक्केच्या घरात असलेल्या महिलांना या स्थितीत कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो याचा विचार करून नियोजन केले जात नाही. वास्तविक या परिस्थितीचा महिलांवर काय परिणाम होतो हे लक्षात घेऊन धोरणांची आखणी करावी. केवळ शेतकरी कुटुंबच नाही तर शेतमजुरांनाही या दुष्काळी स्थितीचा फटका बसतो. त्यांना रोजगार मिळत नाही. अपुऱ्या पावसामुळे पाण्याचा दुष्काळ निर्माण होऊन महिलांना पाणी आणण्यासाठी लांब जावे लागते. अनेक मुली यात गुंतून राहात असल्याने त्यांना शाळेत जाता येत नाही आणि त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. त्यामुळे गावोगावी पाणी व्यवस्थापन समित्या तयार करून त्या समित्यांमध्ये गावातील महिलांना घ्यावे. दुष्काळी धोरण ठरविताना महिलांना त्यात सहभागी करून घ्यावे, अशी आपली मागणी असल्याचे त्या म्हणाल्या.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्‍यांना पत्र लिहून शेतकऱ्यांसाठी काय करावे, त्यांना कशी मदत करावी याबद्दल कळविले आहे. आम्ही आता प्रत्यक्ष महिलांकडून त्यांच्या व्यथा जाणून घेत आहोत. त्याचा अहवाल राज्य शासनाला दिला जाईल. एकल महिला, विधवा महिला, निराधार महिला यांचाही विचार करून या महिलांसाठी विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून केली जाणार असल्याचे फौजिया खान यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार विद्या चव्हाण, जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार आणि इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.