गडचिरोली : जिल्ह्यातील माओवाद संपुष्टात आला असला तरी घातपाती कारवाया करण्यासाठी माओवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेले त्यांचे विविध साहित्य अजूनही अनेक ठिकाणी कायम आहे. वांगेतुरी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील माचुवंचा जंगलात अशाच पद्धतीने जमिनीत पुरून ठेवलेल्या पाच बंदुका आणि स्फोटक साहित्य शोधून काढण्यात पोलिसांना यश आले.
माचुवंचा जंगल परिसरात हे साहित्य लपवून ठेवले असल्याबाबतची माहिती गडचिरोली पोलीस दलास मिळाली होती. त्या आधारे काल 27 ऑक्टोबर रोजी पहाटे पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथकाच्या 4 तुकड्या आणि बॅाम्ब शोधक-नाशक पथकाने अभियान राबविणे सुरू केले. कसून तपासणी दरम्यान 12 क्लेमोर, एक 12 बोअर रायफल, तीन सिंगल शॉट रायफल, एक एअर गन, एक बॉटल ईआयडी स्फोटक, एक जिवंत क्लेमोर स्फोटक, वायरलेस माईक सेट, हत्याराचा लोअर हँडगार्ड, 100 सुतळी बॉम्ब, 5 जोड्या माओवादी गणवेशाचे हिरव्या रंगाचे कापड आणि इतर माओवादी साहित्य घटनास्थळावरुन हस्तगत करण्यात आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे माओवादी साहित्य घटनास्थळावरच नष्ट करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी.जे., पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या देखरेखी यशस्वीरित्या पार पाडली.
































