आरमोरी : कोसरी ग्रामवासीयांच्या सौजन्याने गावातील हनुमान मंदिराच्या आवारात आयोजित रामायण कथा सार सप्ताहाच्या निमित्ताने माजी आमदार कृष्णा गजबे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ग्रामस्थ व आयोजक मंडळाच्या वतीने त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. या सत्काराबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानून या धार्मिक उपक्रमाचे कौतुक केले.
दिनांक 18 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित या सप्ताहात रामायणाचार्य ह.भ.प. सुरेंद्र महाराज बावनकर (नागपूरकर) यांनी आपल्या अमृततुल्य वाणीतून रामायणातील विविध प्रसंगांचे निरूपण करून भाविकांना भक्तिरसात चिंब केले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गजबे म्हणाले की, रामायण हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून तो मानवी जीवनाला योग्य दिशा देणारा संस्कारांचा अनमोल ठेवा आहे. प्रभू श्रीराम यांच्या जीवनातून आपल्याला सत्य, त्याग, कर्तव्यनिष्ठा, बंधुभाव आणि आदर्श जीवनमूल्यांची शिकवण मिळते. आजच्या धावपळीच्या जीवनात अशा धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजात चांगले संस्कार रुजविणे अत्यंत आवश्यक आहे.
गावकऱ्यांनी एकत्र येऊन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणे ही कौतुकास्पद बाब आहे. अशा उपक्रमांमुळे गावात भक्तिभाव, सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वृद्धिंगत होतो. या धार्मिक सोहळ्याच्या आयोजनासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व आयोजकांचे व ग्रामस्थांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
































