आमगाव रेल्वे स्टेशनला ‘अमृत’ भेट, 7.17 कोटी रुपयातून होणार कायापालट

खा.अशोक नेते यांच्या प्रयत्नांना यश

गोंदिया : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील ५५४ रेल्वे स्टेशनचा पूनर्विकास आणि १५०० ओव्हर ब्रिज आणि अंडरपासचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (दि.२६) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाले. यात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या आमगाव रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. आमगाव स्थानकाला मिळालेल्या या अमृत योजनेच्या भेटीमुळे या स्थानकावर ७.१७ कोटी रुपयांचा निधी मिळणार असून त्यातून स्टेशनचा कायापालट होणार आहे.

खासदार अशोक नेते यांनी या स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रयत्न केले होते. त्याला यश येऊन सोमवारी पंतप्रधान मोदी यांनी या योजनेचे उद्घाटन केले. यावेळी आमगाव रेल्वे स्टेशनवर या योजनेचे उद्घाटन भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री खा.अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना खा.अशोक नेते म्हणाले, मी रेल्वेसंबंधीचे अनेक रखडलेले विषय सातत्याने रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करून मार्गी लावलेले आहेत. त्यात आमगाव स्थानकाचा कायापालट करण्यासाठी या स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश व्हावा म्हणून पाठपुरावा केला. अखेर त्यात यश आले आणि ७.१७ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. त्यामुळे या स्टेशनवर रेल्वे प्रवाशांसाठी सुसज्ज वेटिंग हॉल, मोफत वाय-फाय सुविधेसह अनेक प्रकारच्या सोयी उपलब्ध होतील, असे खा.नेते म्हणाले.

यावेळी प्रामुख्याने माजी आमदार केशव मानकर, माजी आमदार भैरसिंग नागपुरे, भाजपचे गोंदिया जिल्हाध्यक्ष ॲड.येसुलाल उपराडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हा परिषद सदस्य छब्बु ऊईके, आमगाव भाजपाचे तालुकाध्यक्ष राजू पटले, शहराध्यक्ष पिंटू अग्रवाल, जिल्हा सचिव नरेंद्र भाजपेई, यशवंत मानकर, राकेश शेंडे, अंजु बिसेन, महिला मोर्चाच्या ग्रामीण अध्यक्ष सुषमा भुजाळे, शहर अध्यक्ष अनिरुद्ध शेडे, नगर महामंत्री मनोज सोमबन्सी, नगर महामंत्री धनलाल मेंढे, परसराम फुंडे, मुन्ना बिसेन तसेच मोठ्या संख्येने नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.