पोर्ला येथे पंचायत समिती गणातील भाजपचे बुथ प्रमुख व वॉरियर्सची बैठक

खा.नेते यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

गडचिरोली : महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खा.अशोक नेते आणि आ.डॅा.देवराव होळी यांनी पोर्ला येथील शिव मंदिरात भाजपच्या बुथ प्रमुख व वॉरियर्सची बैठक घेतली. यावेळी अनेक जणांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करत खा.नेते यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकला.

यावेळी बैठकीला मार्गदर्शन करताना खा.नेते म्हणाले, गडचिरोली पंचायत समिती गणातील पोर्ला या क्षेत्रातील नागरिकांचे नेहमीच मला प्रेम मिळाले आहे. यावेळीसुद्धा ते मिळेल असा विश्वास आहे. निवडणूक जिंकायची असेल तर बुथ सशक्तिकरण महत्वाचे आहे. शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख यांनी गांभीर्याने मतदार याद्यांचे वाचन करावे. बुथ रचना, पेज प्रमुख, पन्ना प्रमुख यावर लक्ष देत बुथ संघटन मजबूत करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पुढे बोलताना खा.नेते म्हणाले, भारताची जागतिक विकासाकडे वाटचाल सुरू आहे. मी केंद्रातून अनेक विकास कामे खेचून आणली आहे. ज्यात रेल्वे, सिंचनाचा प्रश्न असेल, रस्त्यांचे प्रश्न असतील, केंद्रीय विद्यालय, एकलव्य विद्यालय, मेडिकल कॉलेज, सुरजागड लोहप्रकल्प अशी अनेक कामे मंजूर करून घेण्यात माझा सिंहाचा वाटा आहे. एवढेच नाही, तर रेल्वेलाईनच्या सर्व्हेचे सुद्धा काम मंजूर केलेले आहे. याबरोबरच वडसा-गडचिरोली रेल्वेलाईनचे काम प्रगतीपथावर असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी खा.नेते यांच्या नेतृत्वात वाल्मिक निकुरे यांचा भाजपात पक्षप्रवेश करत ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी गावातील समस्याही जाणून घेण्यात आल्या.

याप्रसंगी आमदार डॉ.देवराव होळी, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, माजी पं.स.उपसभापती विलास देशमुखे, तालुका महामंत्री बंडू झाडे, प्रकाश अर्जुनवार, महिला मोर्चाच्या शहर महामंत्री अर्चना चन्नावार, अर्चना बोरकुटे, लोमेश कोलते, रमेश नैताम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

खा.नेते यांच्या विजयासाठी कामाला लागा- डॅा.होळी

खा.अशोक नेते यांच्या नेतृत्वात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये विकासाचे मोठे काम झाल्याचे दिसून येते. त्या कामांचे मतात परिवर्तन करून खासदार अशोक नेते यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी, तसेच पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन आ.डॉ.देवराव होळी यांनी या बैठकीत केले.