दुर्गम भागातील नेत्रविकार जडलेल्या 17 नागरिकांना मिळाली नवी दृष्टी

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा उपक्रम

गडचिरोली : नेत्रविकारामुळे शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना नागपूरला पाठवून मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. आर्थिक परिस्थितीमुळे शहरात जाऊन शस्रक्रिया करणे त्यांना शक्य नव्हते. पण मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या पुढाकाराने 17 जणांना नवीन दृष्टी मिळाळ्याने त्यांनी अहेरी येथील राजवाड्यात येऊन धर्मरावबाबा यांची भेट घेऊन आभार मानले.

दुर्गम भागातील गोरगरिबांना विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी शहरात जाणे शक्य नसल्याने मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात ‘मावा स्वास्थ्य मावा अधिकार’ हा अभिनव उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत खेड्यापाड्यातील रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य उपचार व औषधोपचार केले जात आहेत. दरम्यान अनेक वयोवृद्ध आणि इतर नागरिकांमध्ये नेत्रदोष दिसून आल्याने या रुग्णांना एकाच दिवशी व एकाच ठिकाणी योग्य उपचार व सल्ला मिळावा या हेतूने गेल्या 4 ऑगस्ट रोजी अहेरी येथील इंडियन फंक्शन हॉल येथे भव्य प्रमाणात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यात बऱ्याच गोरगरीब, वयोवृध्द नागरिकांना मोतीबिंदू झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे ज्यांना पुढील उपचाराची गरज होती त्यांना टप्प्याटप्प्याने पाठविले जात आहे.