एटापल्ली, भामरागड तालुक्यात दोन नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा पुढाकार

अहेरी : या विधानसभा क्षेत्रातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल अशी ओळख असलेल्या भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात लोकसंख्येच्या मानाने आरोग्य सेवा अपुरी पडत असल्याने नागरिकांना उपचाराकरिता तालुका मुख्यालयात धाव घ्यावी लागते. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी द्यावी, यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी शासनस्तरावर प्रस्ताव ठेवला होता. त्याची दखल घेत शासनाने एटापल्ली तालुक्यातील जारावंडी आणि भामरागड तालुक्यातील ताडगाव अशा दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी दिली आहे.

एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात बऱ्याच दुर्गम व अतिदुर्गम गावांचा समावेश आहे. शिवाय लोकसंख्येच्या मानाने या दोन्ही तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या देखील पुरेशी नाही. या भागातील आदिवासींना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी मागील अनेक वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी केली जात होती. लोकसंख्येच्या मानाने पुरेशा प्रमाणात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने या भागातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या लक्षात येताच त्यांनी एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात दोन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याची मागणी शासनाकडे रेटून धरली. अखेर एटापल्ली तालुक्यातील जारावंडी आणि भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी दिली आहे.

1.30 लाख लोकसंख्येसाठी 9 आरोग्य केंद्र

एटापल्ली तालुक्याची लोकसंख्या जवळपास ९० हजार एवढी आहे. सध्या जांबिया गट्टा, तोडसा, कसनसूर, कांदोडी बुर्गी आणि पिपली बुर्गी असे एकूण पाच प्राथमिक आरोग्य केंद्र होते. आता जारावंडीत नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाल्याने एटापली तालुक्यात एकूण सहा प्राथमिक आरोग्य केंद्र झाले आहेत. भामरागड तालुक्याची एकूण लोकसंख्या जवळपास ४० हजार असून या ठिकाणी आरेवाडा, लाहेरी आणि मन्नेराजाराम असे तीन प्राथमिक आरोग्य केंद्र होते. आता ताडगावला नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाल्याने भामरागड तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र झाले आहेत.

आरोग्य सेवेसाठी धावपळ थांबणार

एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात लोकसंख्येचा विचार करता पुरेशा प्रमाणात वैद्यकीय सुविधा नसल्याने या भागातील नागरिकांना तालुका मुख्यालयात धाव घ्यावी लागत होती. ही धावपळ थांबविण्यासाठी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळावी यासाठी माझे प्रयत्न सुरू होते. 2023 मध्ये पीपली बुर्गी आणि आता जारावंडी व ताडगाव अशा नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना शासनाने मंजुरी दिली आहे. उपकेंद्र आणि आरोग्य पथक असलेल्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र होणार असल्याने या भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल, अशी आशा आहे.

– डॉ.धर्मरावबाबा आत्राम, मंत्री, अन्न व औषध प्रशासन