Home पब्लिक प्रॉब्लेम विहीरगावला हत्तींच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान; शेतकरी अडचणीत

विहीरगावला हत्तींच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान; शेतकरी अडचणीत

मा.आ.कृष्णा गजबे यांनी केली पाहणी

नुकसानग्रस्त शेतात पाहणी करताना मा.आ.कृष्णा गजबे

देसाईगंज : तालुक्यातील मौजा विहीरगाव येथे रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकतेच रोवणी केलेले धानपीक हत्तींनी फस्त करत तुडवल्यामुळे शेतकऱ्यांचे स्वप्न करपल्या गेले. या पार्श्वभूमीवर माजी आमदार कृष्णा गजबे यांनी मंगळवारी विहीरगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

या पाहणीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हत्तींच्या उपद्रवामुळे पिकांचे झालेले नुकसान, शेतीत निर्माण झालेली असुरक्षितता आणि शेतकऱ्यांवर आलेले आर्थिक संकट याबाबत ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या जमिनींचे सर्वे क्रमांक आणि संबंधित माहितीही सादर केली.

मा.आ. गजबे यांनी शेतकऱ्यांना धीर देत शासनाकडून योग्य आणि भरीव नुकसानभरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच नुकसानग्रस्त भागाचा तातडीने पंचनामा करून अहवाल सादर करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

या पाहणीदरम्यान राजकुमार झुरे, जनार्दन मेश्राम, विलास मेश्राम, तुळशीराम जुमनाके, अनुराधा मेश्राम, दयाराम उईके, बिसन नेवारे, यशवंत नेवारे, मन्साराम नेवारे, शिवराम नागतोडे, होमराज तलमले, संतोष उईके, मोतीराम नेवारे, संतोष मडावी यांच्यासह इतरही अनेक नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

रानटी हत्तींच्या सततच्या उपद्रवामुळे परिसरातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.