गडचिरोली : जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर ग्राहकांना नियमानुसार आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सुविधा नि:शुल्क उपलब्ध नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे या सुविधा देण्यासाठी संबंधित पेट्रोलपंप चालकांना बाध्य करावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत गडचिरोलीच्या वतीने एका निवेदनातून जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांना करण्यात आली.
जिल्ह्यात ग्राहकांमध्ये जनजागृतीचे काम सुरु आहे. ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 च्या कलम 6 व 8 नुसार ग्राहकांच्या अधिकारांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी राज्यस्तरावर राज्य ग्राहक संरक्षण परिषद, तर जिल्हास्तरावर जिल्हा ग्राहक पंचायत स्थापन करण्यात आली आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने दिलेल्या निवेदनात अनेक समस्या मांडण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने पेट्रोल पंपावर शासनाच्या नियमानुसार नि:शुल्क पुरुष व महिलांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृह, नि:शुल्क हवा केंद्र, पंपवर झिरोचे आकडे करणे, नि:शुल्क शुद्ध व थंड पिण्याचे पाणी, पितळी वजन मापे ठेवणे या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जात नाहीत.
तसेच येथे कार्यरत कर्मचारी वर्ग मद्यपान व खर्रे खाऊन राहतात. ग्राहकांना पेट्रोल देताना असे नेहमी निदर्शनास येत आहे. याबाबत ग्राहक पंचायतकडे अनेक ग्राहकांनी तोंडी तक्रारी केल्या आहेत. याबाबत ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपावर याबाबत स्वतः अनुभव घेतला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी यावर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याची सूचना दिली. यावेळी सहजिल्हा पुरवठा अधिकारी कापडे, ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पतरंगे, जिल्हा सचिव उदय धकाते, जिल्हा संघटक विजय कोतपल्लीवार, सदस्य अरुण पोगळे आदी उपस्थित होते.