अहेरी : नजीकचे येंकापल्ली गावाला दरवर्षी पुराचा फटका बसतो. त्यामुळे पावसाळ्यात येंकापल्लीवासियांचे अतोनात नुकसान होऊन नागरिकांची ससेहोलपट होत असते. गावालगत आबादी जागा असून येंकापल्ली गावाचे त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची एकमुखी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार व गाववासियांनी गुरुवारी येथील अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटल्यानुसार, सन 1986 पासून सतत पावसाळ्यात येंकापल्ली गावाला पुराचा फटका बसतो. पावसाळ्यात या गाववासीयांचे जनजीवन विस्कळीत होत असते. गावाच्या लगतच सुरक्षित व आबादी जागा आहे. त्या ठिकाणी पुराचे पाणी पोहोचत नसल्यामुळे तिथे पुनर्वसन करण्याची मागणी गाववासीयांनी अप्पर जिल्हाधिकारी अहेरी यांच्याकडे केली. यावेळी बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते.