सिरोंचा : तालुक्यातील झिंगानूर येथील पाणीपुरवठा बऱ्याच दिवसांपासून विस्कळीत झाला होता. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना होत असलेला त्रास दूर करण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांनी पुढाकार घेतला. अभियंता, कंत्राटदार आणि जलसुरक्षकाला घेऊन झिंगानूरला भेट देऊन तेथील तांत्रिक अडचण दूर केली. त्यामुळे घराघरात पाणी पुरवठा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
झिंगानूर येथील पाणीपुरवठा काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत होते. यासंदर्भात गावकऱ्यांनी तक्रारीही केल्या होत्या. दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर हर्षवर्धनबाबा आत्राम यांनी झिंगानूर गाठून समस्या जाणून घेतली. त्यानंतर तांत्रिक अडचण दूर करून पाणी पुरवठा सुरळीत केला. सर्वत्र सुरळीत पाणी पोहोचत आहे किंवा नाही याची त्यांनी खात्रीही केली. या जलसंकटातून गावकऱ्यांना बाहेर काढल्याने गावातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी अभियंता सदाशिव कोठारी, अमोल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, सलार सय्यद, बोडका गावडे, संतोष गावडे, सत्यनारायण चिलकामारी, जुगनू शेख, रामचंद्रम कुमरी, जगदीश महेश, रमेश मनेम, आकाश राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.