गडचिरोली : गडचिरोली तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या जांभळी-घोटेविहीर जंगल परिसराचा आधार घेऊन चोरट्या मार्गाने हातभट्टी लावून दारू गाळणाऱ्यांविरुद्ध मुक्तिपथच्या पुढाकाराने कारवाई करण्यात आली. गाव संघटनेच्या मदतीने केलेल्या या अहिंसक कृतीमध्ये दारू विक्रेत्यांचा 24 ड्रम मोह्फुलाचा सडवा आणि 20 लिटर दारू नष्ट करण्यात आली.
गडचिरोली व धानोरा तालुका सीमेवर असलेल्या जांभळी, सीताटोला, रानभूमी, घोटेविहीर या गावातील विक्रेते जंगल परिसराचा आधार घेऊन हातभट्टी लावून दारू गाळतात. या विक्रेत्यांच्या माध्यमातून परिसरातील विविध किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जातो.
आतापर्यंत पोलिसांनी त्यांच्यावर अनेक वेळा कारवाई केली. तरीसुद्धा काही विक्रेत्यांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला आहे. यासाठी मुक्तीपथ तालुका चमुतर्फे जागृती व अहिंसक कृतीसह विविध उपक्रम राबविले जात आहेत. दरम्यान जंगल परिसरात विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात मोहफुलाचा सडवा तयार केला असल्याची माहिती गाव संघटनेने दिली. या माहितीच्या आधारे गाव संघटनेच्या मदतीने मुक्तीपथ गडचिरोली व धानोरा टीमने संबंधित जंगल परिसरात शोधमोहीम राबवून विविध ठिकाणी मिळून आलेला मुद्देमाल नष्ट केला.
या कृतीमध्ये 24 ड्रम मोहफुलाचा सडवा 20 लिटर दारू व दारू गाळण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले. या कृतीमुळे दारू विक्रेत्यांचे मोठे नुकसान करण्यात यश आले आहे.